हेमंत चापुडे, झी मीडिया, पुणे : शिरुर लोकसभा मतदारसंघ हा कोरेगाव-भीमा गावात येतो. या गावाभोवतीच यंदाचे राजकारण आणि निवडणुकीचा निकाल केंद्रीत होण्याची शक्यता आहे. एक जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव भीमात हिंसाचार झाला. हिंसाचाराचे हे प्रकरण सरकारने ज्या पद्धतीने हाताळले त्याचे पडसाद मतपेटीत उमटण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात जवळपास २ लाख दलित मतदार आहेत. त्यामुळे यंदा शिरूरचा खासदार ठरवण्यात दलित मतदार निर्णायक भूमिका बजावणार हे स्पष्ट झाले आहे.
शिरुरच्या रणांगणात राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे, शिवसेनेचे शिवाजीराव आढाळराव आणि बहुजन वंचित आघाडीचे राऊल ओव्हाळ रिंगणात आहेत. कोरेगाव भीमा हिंसाचारानंतर या भागातल्य़ा दलितांमध्ये प्रकाश आंबेडकरांनी विश्वास निर्माण केला आहे. त्यामुळे आता दलित मतदान ज्याच्या पारड्यात तो खासदार अशी स्थिती असल्याचे या भागातले जाणकार पैजेवर सांगू लागले आहेत.
शिरूर लोकसभा मतदार संघात यावेळी अतिशय चुरशीची लढाई पाहायला मिळणार आहे.शिवसेनेचे पंधरा वर्ष खासदार असलेले शिवाजी आढळराव पाटील आणि स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतून घराघरात पोहचलेले राष्ट्रवादी कॉग्रेसचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यात या ठिकाणी खरी लढत आहे. विजय कोणाचा होणार हे 23 मे च्या निवडणूक निकालानंतर स्पष्ट होणार असले तरी शिरूर लोकसभा मतदार संघात दलित मतदार कोणाच्या बाजूने उभे राहतात याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.
कारण कोरेगांव भिमा येथे 200 व्या शौर्यदिनी झालेल्या दंगलीचे पडसाद संपुर्ण देशभरात उमटले होते आणि या दंगलीनंतर ज्या मतदार संघात कोरेगांव भिमा येते त्या शिरूर लोकसभा मतदार संघातील दलित मतदार हा कोणाच्या बाजूने उभा राहतो हे ही तितकेच महत्वाचं असणार आहे.
दलित समाजाचे प्रेरणास्थान असलेले कोरेगांव भिमा ज्या शिरूर लोकसभा मतदार संघात येते त्या शिरूर लोकसभा मतदार संघात जवळपास दोन लाख दलित मतदार आहेत. हे दलित मतदार शिवसेना उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांना मदत करतात ?, राष्ट्रवादी कॉग्रेसचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांना मदत ? की ईतर कोणाच्या बाजूने उभे राहतात ? हे ही तितकेच महत्वाचे असणार आहे. दलित मतदार ज्यांच्यासोबत जाणार त्या उमेदवाराचे पारडे निश्चितच जड असणार आहे. त्यामुळे दलित मतदार कोणाच्या पाठीशी उभे राहतो आणि कुठल्या उमेदवाराला आपल्या मतदार संघातील लोकप्रतिनी खासदार म्हणून दिल्लीत पाठवतो हे ही पाहणे महत्वाचे असणार आहे.