शिर्डी : लॉकडाऊनमुळे मंदिरांत भक्तांकडून करण्यात येणाऱ्या दानावरही परिणाम झाला आहे. शिर्डी साई बाबा संस्थानला दररोज जवळपास दीड कोटी रुपयांहून अधिकचं नुकसान होत आहे. शिर्डीत साईंच्या चरणी भक्तांकडून वर्षभरात जवळपास 600 कोटी रुपयांचं दान केलं जातं. म्हणजेच जवळपास दररोज 1 कोटी 64 लाख रुपयांहून अधिक दान दिलं जातं.
लॉकडाऊनमुळे मंदिर बंद असल्याने 17 मार्च ते 3 मेपर्यंत ऑनलाईन डोनेशनद्वारे 2 कोटी 53 लाखांहून अधिक रुपयांचं दान देण्यात आलं आहे. म्हणजे दररोज दान रुपात 6 लाख रुपये देण्यात आले आहेत.
अशात साईबाबा संस्थानला दररोज 1 कोटी 58 लाख रुपयांचं नुकसान होत आहे. जर लॉकडाऊन असंच सुरु राहिलं आणि आणखी पुढे जूनपर्यंतही वाढवण्यात आलं तर मंदिर संस्थानला 150 कोटी रुपयांहूनही अधिक नुकसान होऊ शकतं. मंदिर सुरु असताना दररोज जवळपास 40 ते 50 हजार भक्त साईंचं दर्शन घेतात.
शिर्डी संस्थानकडून अनेक प्रकारची सामाजिक कामं केली जातात. शिर्डी संस्थानकडून भक्तांना प्रसाद म्हणून देण्यात येणारा लाडू स्वस्त दरात दिला जातो. संस्थान दरवर्षी या लाडूवर 40 कोटी रुपये खर्च करते.
त्याशिवाय शिर्डी संस्थानकडून दरवर्षी हजारोंच्या संख्येने रुग्णांवर मोफत उपचार केले जातात. या उपचारांमध्ये हृदयशस्त्रक्रिया किंवा मोठ्या संख्येत डायलिसिसच्या मशिन लावण्यापासून इतर आजारांवरही मोफत उपचार केले जातात.
संस्थानकडून मेडिकलवर दरवर्षी 100 कोटी रुपये खर्च करण्यात येतात. शिर्डी संस्थानकडून मोठ्या संख्येने गरीब मुलांच्या शिक्षणाचा खर्च केला जातो. साई बाबा मंदिर साफ, स्वच्छ ठेवण्यासाठी, तेथील व्यवस्था चालवण्यासाठी जवळपास 8000 कर्मचारी दिवस-रात्र काम करतात. या सर्वांवर साई संस्थान दरवर्षी 160 कोटी रुपये खर्च करतात.
शिर्डी संस्थानला दरवर्षी जवळपास 600 कोटी रुपयांचं दान भक्तांकडून केलं जातं. यात 400 कोटी रुपये दान रुपात असून त्यात सोनं, चांदी आणि इतर गोष्टींचा समावेश असतो. साई संस्थानकडे बँकेत 2300-2400 कोटी रुपये बँकेत असून त्यावर दरवर्षी 100-150 कोटी रुपये व्याज रुपात येतात.