रत्नागिरी: शिकारीसाठी लावलेल्या फासकीत बिबट्या अडकल्याची घटना रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील वांघ्रट गावी घडली. भक्षाचा पाठलाग करताना हा बिबट्या वांघ्रट गावात आला असता, तो शिकारीसाठी लावलेल्या फासकीत अडकला. फासकीत बिबट्या अडकल्याची ग्रामस्थांना माहिती मिळताच त्यांनी वनविभागाला याबाबत तत्काळ कल्पना दिली. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी १२ तासानंतर भुकेने व्याकुळ झालेल्या बिबट्याला जेरबंद केले. बिबट्याची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
दरम्यान, वन्य प्राण्याची शिकार करण्यासाठी फासकी लावली जात असतानाच दुसऱ्या बाजूला मुक्त वातावरण मिळाल्यास प्राणीही कशी पार्टी करतात याचे उदाहरण पहायला मिळाले आहे. ही घटना आहे लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील. निलंगा तालुक्यातील राजेवाडी शिवारात वानरांची 'मँगो पार्टी' सुरु आहे. या परिसरातील आंब्याच्या झाडांवर वानरांच्या अशा झुंडीच्या झुंडी 'मँगो पार्टी' करताना दिसतात. झाडाखाली बसून पाडाला आलेले आंबे ही माकडं खाऊन फस्त करत आहेत. त्यांच्या मँगो पार्टीची ही दृश्यं 'झी २४ तास'च्या कॅमेऱ्यात कैद झालीत. झाडाचा तोडलेला आंबा हा पिकलेला नसल्यामुळं पाडाचा आंबा खाण्यासाठी या वानरांमध्ये मोठी चढाओढ असल्याचेही दिसून येते. एकूणच उन्हाळ्याचा हा आंब्याचा सिझन वानरांसाठी मोठी पर्वणीच ठरल्याचं दिसून येतंय.
दरम्यान, बिबट्याची शिकार करू पाहणाऱ्या अज्ञात शिकाऱ्याविरोधात एका बाजूला संताप व्यक्त होत आहे. तर, दुसऱ्या बाजूला माकडांच्या 'मँगो पार्टी'कडे कौतुकाने पाहिले जात आहे.