वीज बिल न भरल्यामुळे १५ दिवसांपासून पालिकेचा पाणीपुरवठा खंडित

 वीज बिल न भरल्यामुळे महापालिकेचा पाणी पुरवठा हे गेल्या १५ दिवसांपासून खंडित

Updated: Feb 23, 2020, 09:57 AM IST
वीज बिल न भरल्यामुळे १५ दिवसांपासून पालिकेचा पाणीपुरवठा खंडित title=

शशिकांत पाटील, झी मिडीया, लातूर जिल्हा : लातूर महानगरपालिकेने जलशुद्धीकरण केंद्रावरील वीज बिल न भरल्यामुळे महापालिकेचा पाणी पुरवठा हे गेल्या १५ दिवसांपासून खंडित झाला आहे. त्यामुळे लातूरकरांना कृत्रिम पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्यामुळे सोमवारनंतरच यावर तोडगा निघू शकेल असे लातूरच्या महापौरांनी स्पष्ट केलंय. तर नागरिकांनी लवकरात लवकर मालमत्ता कर भरण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. 

लातूर शहरातील नागरिकांना पाणी टंचाईची समस्या कायमचीच झाली आहे. कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटामुळे लातूर शहराला पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. २०१६ ला रेल्वेने पाणी पुरवठा करावा लागला होता. लातूरला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा ३६ दलघमी इतका पाणी साठा शिल्लक आहे. हे पाणी १० दिवसाआड प्रमाणे ऑक्टोबर २०२० पर्यंत पुरु शकेल इतकं आहे. मात्र तरीही गेल्या १५ दिवसांपासून लातूर शहरातील नागरिकांच्या नळाला पाणी आलेलं नाही. 

कारण महापालिकेने हरंगुळ, नागझरी, साई आणि वरवंटी येथील जलशुद्धीकरण केंद्राचे वीज बिल न भरल्यामुळे महावितरणने वीज पुरवठा खंडित केला आहे. सप्टेंबर २०१९ पासूनचे जवळपास ०१ कोटी २५ लाखाचे वीज बिल थकलं आहे.त्यामुळे महावितरणने वीज पुरवठा खंडित केला आहे. परिणामी लातूरकर नागरिक पाण्याअभावी कमालीचे हैराण झाले आहेत. १५ दिवसांपासून पाणी नसल्यामुळे स्वयंपाक, घरगुती कामासाठी पाणी कुठून आणायचे असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत. त्यामुळे पाणी टंचाईच्या  समस्येवर आता कायमचा तोडगा काढण्याची मागणीही नागरिक करीत आहेत. 

१५-१६ दिवसांपासून पाणी नाही. मजुरी करावी का पाणी आणावं. धरणात पाणी आहे तरी इतके हाल. लाईट बिल न भरल्यामुळे अडचण आहे. धुण्या-भांड्याला पाणी नाही. आम्ही कपडे धुतले नाहीत ०२-०३ दिवसापासून. विकत घेऊन उद्या धुवावे लागतील. नदीला पाणी असतं तर लाईट नसते आणि लाईट आहे तर पाणी नाही अशी प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करतात. 
  
पाण्याशिवाय काही काम होत नाही. पिण्याच्या पाण्याची अडचण. कुणाला पाणी मागावं. उन्हाळ्याच्या अगोदरच इतके हाल आहेत. नागरिकांचे हाल होत आहेत. 

त्यात लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी तर मनपाच्या तिजोरीत खडखडाट असल्याची कबुली दिली आहे. त्यामुळेच महावितरणने वीज बिल खंडित केलं असून मागच्या अनेक वर्षांपासून मनपाला आर्थिक व्यवस्थापनाचे गांभीर्य नसल्याचेही ते म्हणाले आहेत. येत्या सोमवारपर्यंत ७४ लाख रुपये भरले तर वीज पुरवठा सुरळीत होऊन तोडगा निघू शकेल असेही महापौरांनी स्पष्ट केलं आहे. तर नागरिकांनी मालमत्ता कर भरून सहकार्य केल्यासच सर्व सुविधा पुरविता येणं शक्य असल्याचे जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त जी. श्रीकांत यांचे म्हणणे आहे. 

मागील ६-७ महिन्यापासून वीज बिल न भरल्यामुळे मनपाचे पाण्याचे व्यवस्थापन कोलमडले. मागच्या अनेक वर्षांपासून आर्थिक व्यवस्थापनाचे गांभीर्य  नसल्यामुळे आज ही वेळ. आर्थिक स्थिती चांगली नाही तिजोरीत खडखडाट आहे. त्यामुळे वीज बिल भरणे शक्य नाही. सोमवारपर्यंत ७४ लक्ष रुपये वीज भरल्यानंतर हा प्रश्न निकाली निघेल असे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी सांगितले.

कर भरला तर लाईट बंद होईल, पाणी पुरवठा पण सुरळीत होणार नाही. येत्या एक महिन्यात संपूर्ण कर भरावा. लाईट बिल प्रॉपर्टी टॅक्स मधूनच भरता येतो. आपण भरलं तर बाकी व्यवस्था करता येतील असे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत म्हणाले.  कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटामुळे लातूरकरांचे पाण्यावाचून हाल सुरूच आहेत. पाण्याच्या या चक्रव्यवहातुन लातूरकरांची कधी सुटका होते याच वाट आता लातूरकर नागरिक बघत आहे.