Maharashtra Weather Updates: पावसाचे दिवस सुरु झाल्यानंतर राज्याच्या कोकण पट्ट्यामध्ये आणि काही डोंगररांगाांच्या परिसरामध्ये दरडसत्रांना सुरुवात होते. परिणामी दैनंदिन वाहतुकीवर याचे थेट परिणाम होताना दिसतात. अशीच काहीशी परिस्थिती रायगड - पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर ओढावल्याची पाहायला मिळाली. कारण इथं दरड कोसळल्याचं वृत्त समोर येत आहे.
दरड कोसळल्यामुळं पोलादपूरकडून महाबळेश्वर आणि महाबळेश्वरकडून पोलादपूर मार्ग वाहतूकीसाठी बंद करण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे. आंबेनळी घाटात कालिकामाता मंदिराजवळ ही दरड कोसळल्याचं वृत्त हाती आलं. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवीत अथवा वित्त हानी नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. दरड कोसळल्याचं वृत्त मिळताच प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमनं तातडीनं मदत कार्य हाती घेत दोन्ही बाजूला बॅरीगेट लावून रस्ता बंद केला. दरम्यान या घटनेनंतर पर्यायी ताम्हाणी घाट मार्गाचा वापर करावा असं आवाहन पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी केलं.
दरम्यान, इथे मुंबईत पावसाचा जोर वाढतच असून, बुधवारी दुपारपासून पाऊस आणखी मुसळधार कोसळणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली.
28 Jun, 10 am:
मुंबईत गेल्या तीन तासांपासून जोरदार पाऊस झाला. पुढील ३, ४ तास सुरू राहण्याची दाट शक्यता आहे
काळजी घ्या pic.twitter.com/6ULb58T5sZ— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 28, 2023
हवमानशास्त्र विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार पावसाची हजेरी असेल. तर, बुधवारी कोकण आणि विदर्भाला पाऊस झोडपून काढेल. मुंबईसाठी पावसाच्या पार्श्वभूमीर यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तिथं गोंदियातही ऑरेंज अलर्ट लागू करण्यात आला आहे. गोंदियाच्या 7 तालुक्यांत मागील 24 तासांत 107 मीलीमीटर पावसाची नोंद झाली. ज्यामध्ये सर्वाधिक पाऊस अर्जुनी मोरगाव तालुक्यात झाला. परिणामी तालुक्यातील नदी-नाले ओसंडून वाहू लागले. सांगली शहरातही पावसाची दमदार हजेरी लागली. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास इथं पावसानं चांगलाच जोर धरला. यामुळे शेतकऱ्यांनीही शेतीच्या कामांना सुरुवात केली.
पुणे जिल्ह्यातही पावसानं सर्वांनाच आनंद दिला. ज्यामुळं उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. वसई विरारही याला अपवाद ठरला नाही. इथंही पावसाने चांगलाच जोर धरला असून काही प्रमाणात जनजीवनही विस्कळीत झालं. तर येथील ग्रामीण भागातील सखल परिसरांसह मुंबई-अहमदाबाद महामार्गालगतचा सर्व्हिस रोड पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळालं.
महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये पावसाळी पर्यटनाच्या निमित्तानं तरुणाई मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसते. नाणेघाट, ताम्हिणी घाट, देवकुंड धबधबा या आणि अशा ठिकाणांवर खुलणारं निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी अनेकजण धाव मारतात. पण, इथं येऊन बेभान होऊन आनंद लुटताना सामाजिक भान मात्र ही मंडळी विसरतात आणि अनेकदा ही मजा काहींच्या जीवावर बेतताना दिसते. परिणामी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सध्या प्रशासनानं काही पावसाळी पर्यटन स्थळांवर पर्यटकांना येण्यास मज्जाव केला आहे.