आशीष अम्बाडे, झी 24 तास, चंद्रपूर : चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रु़ग्णालयामध्ये कंत्राटी सफाई कामगारांसाठी काढण्यात आलेली निविदा नियमबाह्य असल्याची तक्रार करण्यात आली आहे. कामगारहिताचे कायदेशीर आर्थिक फायदे निविदेतून वगळल्याचा गंभीर प्रकार या तक्रारीच्या निमित्तानं समोर आलाय. याप्रकरणी आता जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली आहे.
चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालयात स्वच्छतेसाठी कंत्राटी सफाई कामगार पुरविण्याचे दोन कोटी ४२ लाख रुपयांचे कंत्राट मागील जून महिन्यात 'इंटरनॅशनल सिक्युरिटी एजन्सीला' देण्यात आले. या एजन्सीची निविदा मंजूर करताना अनेक मूलभूत बाबींकडे दुर्लक्ष करण्यात आलं. कामगारांना देय घरभाडे भत्ता, ग्रॅज्युटी आदी वैधानिक रकाने भरलेलेच नाहीत. यामुळं हा लाभ कामगारांना मिळू शकत नाही. यातून किमान वेतन कायद्याचंही उल्लंघन झालं आहे. पण तरीही या एजन्सीची निविदा पात्र ठरवण्यात आली. याबाबत जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी जिल्हाधिका-यांच्याकडे तक्रार केली. या तक्रारीची दखल जिल्हाधिकारी खेमणार यांनी घेतली आहे.
देशमुख यांनी हा गंभीर प्रकार लक्षात आणून देत कामगारांना न्याय देण्याची मागणी जिल्हाधिका-यांकडे केली. या मागणीवजा तक्रारीची दखल घेत जिल्हाधिका-यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचं आश्वासन दिलं. त्यांनी जिल्हा दक्षता संनियंत्रण समितीकडे हे प्रकरण चौकशीसाठी सोपवलं आहे. त्यात येत्या १७ जुलैपर्यंत वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांकडून खुलासा मागवण्यात आला आहे. निविदेमध्ये अनियमितता आढळली, तर वैद्यकीय शिक्षण विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभागाकडे प्रकरण कारवाईसाठी पाठवलं जाणार आहे.
निविदेनुसार काम देताना कामाच्या आदेशात विविध अटी टाकण्यात आलेल्या आहेत. यामध्ये पंधरा क्रमांकाच्या अटीमध्ये कंत्राटदाराने अटी व शर्थीचे उल्लंघन केल्यास त्याच्याविरुद्ध कोणती कारवाई केली जाईल, हे स्पष्ट नमूद केलेले आहे. मात्र अशा कारवाईची तरतूद इंटरनॅशनल सिक्युरिटी एजन्सीसोबत करण्यात आलेल्या करारामध्ये नाही. त्यामुळं ही निविदा वादग्रस्त ठरली असून, हे झुकतं माप या कंत्राटदाराला कसं देण्यात आलं, हे आता चौकशीअंतीच स्पष्ट होणार आहे.