प्रथमेश तावडे, झी मीडिया,
Vasai Crime News: वसई पश्चिमेच्या सनसिटी येथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत ठेकेदाराच्या भावाची हत्या करण्यात आली आहे. मोईन महम्मद (३८) असे हत्या झालेल्या इसमाचे नाव आहे. ठेकादार आवेश फारूख याने कासा द तेरेजा या इमारतीचे काम हाती घेतले आहे. या ठिकाणी आरोपी अरबाज आलम मजुरी काम करतो. त्यानेच ठेकेदाराच्या भावाची हत्या केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला सात तासात अटक केली आहे.
८ महिन्यांपासून ठेकेदाराने पगार थकवल्याने ठेकेदाराच्या भावाची हत्या केल्याची कबुली आरोपी अरबाज आलम यांने पोलिसांना दिली आहे. हत्येनंतर आरोपी हा बिहारला पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी अवघ्या ७ तासात आरोपीला लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकातून अटक केली आहे.
आरोपी अरबाज याने ठेकेदाराचा भाऊ मोईन मोहम्मद याची शनिवारी रात्री डोक्यात लाकडी फळी घालून हत्या केली होती. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करुन लाकडी फळी जप्त केली आहे.
आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांची टिम रवाना झाली होती. फरार झालेल्या आरोपीच्या शोधासाठी विविध पथके रवाना केल्याची माहिती माणिकपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपतराव पाटील यांनी दिली होती.
आरोपी अरबाज याचा मोबाईल शनिवारी दुपारी चोरीला गेला होता. त्याचे लोकेशन अंधेरीच्या जुहू परिसरात होते. त्यामुळे पोलिसांचे एक पथक जुहू परिसरात तपास करत होते. मात्र तो मोबाईलही बंद झाला होता. त्यामुळे पोलिसांची दिशाभूल झाली होती. हत्या केल्याच्या रात्रीच आरोपी बिहारला पळून जाणार होता. मात्र पैसे नसल्याने त्याने स्थानक परिसरात रात्र घालवली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
वसई सामूहिक हत्याकांडातील आरोपीला पुन्हा अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. दिलीप तिवारी असं आरोपीचे नाव आहे. बहिणीने खालच्या जातीच्या मुलाशी लग्न केल्याच्या राग आरोपी दिलीप याच्या मनात होता. त्याच रागातून त्याने बहिणीच्या कुटुंबातील चार जणांची गळे चिरून हत्या केली होती. या प्रकरणात तो कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात शिक्षा भोगत होता. मात्र पॅरोलवर असताना तो फरार झाला होता. फरार असताना तो इतर गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रीय होता, अशी खबर पोलिसांना लागली होती. त्यानुसार वालीव पोलिसांनी या आरोपीची माहिती मिळवली. माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचून त्याला पुन्हा अटक करण्यात यश मिळविले आहे.