सागर गायकवाड, झी मीडिया, नाशिक: महाराष्ट्रातील अनेक भागांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. त्यामुळेच भाज्यांच्या दरांमध्येही वाढ झाल्याचं मागील काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. सणासुदीच्या सुरुातीलाच सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच भाज्यांचे दर कडाडल्याचं दिसत आहे. असं असतानाच काही दिवसांपूर्वीच कोथिंबीरीने (Kothimbir Rate In Nashik Today) 450 रुपये जुडीचा टप्पा गाठल्याचं वृत्त समोर आलं होतं. मात्र अवघ्या काही दिवसांमध्ये हा विक्रमही कोथिंबीरीने मोडीत काढला असून आता किचनमधील या दैनंदिन वापराच्या गोष्टीची किंमत गगनाला भिडल्याचं दिसत आहे. कोथिंबीरीच्या एक जुडीच्या किंमतीत टू व्हिलरची टाकी फुल होईल इतकी दरवाढ सध्या बाजारपेठेत पाहायला मिळत आहे.
नाशिकमध्ये गेल्या दोन-तीन दिवसापासून पावसाची रीपरीप सुरू आहे. सततच्या पावसामुळे नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पालेभाज्याची आवक घटली असून ती अगदी 10 ते 15 टक्क्यांवर आलेली आहे. शुक्रवारी म्हणजेच 6 सप्टेंबरच्या सायंकाळी पार पडलेल्या लिलावात एका शेतकऱ्याच्या कोथिंबिरीला विक्रमी भाव मिळाला. या शेतकऱ्याच्या कोथिंबीरीला सर्वाधिक म्हणजेच 100 जुड्यांना 48 हजार रुपये इतका भाव मिळाला आहे. म्हणजे या शेतकऱ्याच्या शेतातील कोथिंबिरीची प्रत्येक जुडी जुडी तब्बल 480 रुपयाला व्यापाऱ्याने खरेदी केली. अन्य एका शेतकऱ्याला 390 रुपये प्रति जुडी ऐवढा भाव मिळाला आहे. यामुळे सगळ्याच भाज्यांना आणि जेवणाला चव देणारी कोथिंबीर ही जेवणाच्या ताटातूनच गायब झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. म्हणजेच कोथिंबिरीच्या एका जुडीच्या किंमतीमध्ये साडेचार लिटरहून अधिक जास्त पेट्रोल येईल. सध्या एक लिटर पेट्रोल 103.44 रुपयांना आहे. याचाच अर्थ असा की दुचाकीची पेट्रोलची टाकी पूर्ण भरली जाते तितक्या किंमतीत कोथिंबिरीची एक जुडीही येणार नाही.
ऐन सणासुदीच्या काळात एवढ्या महाग झालेल्या कोथिंबीर गृहिणींचा घरातील बजेट कोलमडून गेलं आहे. नाशिक कृषि उत्पन्न बाजार समितीत सद्यःस्थितीत नाशिक, सिन्नर, दिंडोरी, पिंपळगाव, त्र्यंबकेश्वर आदी भागांमधून पालेभाज्या व फळभाज्या येत आहेत. नाशिक बाजार समितीत खरेदी केलेला शेतमाल हा मुंबई, गुजरात अहमदाबादकडे पाठविला जातो. काही प्रमाणात येथील शेतमाल हा स्थानिक विक्रीसाठी व्यापारी खरेदी करत असतात. पालेभाज्या आवक सद्यःस्थितीत घटली आहे. यामुळे बाजारभाव वधारले आहेत . बाजार समितीत झालेल्या लिलावात गावठी कोथिंबीर 80 किमान ते सर्वाधिक 480 रुपये जुडी, मेथी किमान 25 रुपये तर सर्वाधिक 69 रुपये जुडी, शेपू किमान 20 रुपये तर सर्वाधिक 39 रुपये जुडी दराने उपलब्ध आहे.
नक्की वाचा >> 'गणनायका, शिंदे सरकारचे विघ्न कायमचे घालवण्यासाठी...'; ठाकरेंच्या शिवसेनेचं साकडं
त्याचप्रमाणे कांद्याची पात किमान 18 रुपये तर सर्वाधिक 38 रुपये जुडी भावाने मिळत आहे. तेच किरकोळ बाजारात कोथिंबीर, मेथी, शेपू, कांदापात यांची झुडी छोटी करून दुप्पट बाजार भावाने विक्री होत आहेत.
एकीकडे कोथिंबीर सर्वसामान्यांच्या बजेट बाहेर गेलेली असतानाच दुसरीकडे मिळत असलेल्या चांगल्या भावामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येलाच कोथिंबिरीमुळे अनेक शेतकऱ्यांवर लक्ष्मी प्रसन्न झाल्याचं दिसत आहे.