मुंबई : ८ मार्चच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त (International Women`s Day) कोकण रेल्वेने महिलांसाठी एक गुडन्यूज दिली आहे. कोकण रेल्वेची पहिली महिला सारथी म्हणून शिल्पा माने (रत्नागिरी), तर दुसऱ्या शामला नागे (श्रीवर्धन) आता तिसऱ्या प्रिया तेटगुरे यांची नेमणूक झाली आहे. प्रिया या आता यापुढे कोकण रेल्वेच्या (Konkan Railway) सहाय्यक पायलट (Assistant Loco Pilot) म्हणून महिला असणार आहे. सह्याद्रीच्या कडेकपारीतून आणि निसर्गाच्या सानिध्यातून धावणारी कोकण रेल्वे. मोठ-मोठे पुल आणि बोगदे यातून मार्ग काढत जाणारी रेल्वे. अशा आव्हानांचा सामना करत कोकण रेल्वे चालविणे एक आव्हानच. हे आव्हान पेलत कोकण रेल्वे चालविण्याचा मान पहिला मान हा शिल्पा माने यांच्या माध्यमातून महिलांना मिळाला आहे. महिला सक्षमीकरणाच्या एका नव्या अध्यायच्या पटकथेची सुरुवात कोकण रेल्वेत आंतराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला होत आहे. आणखी एक महिला प्रिया तेटगुरे यांच्या निमित्ताने कोकण रेल्वेत सहाय्यक पायलट असणार आहे. ही महिलांसाठी गौरवशाली बाब ठरली आहे.
प्रिया बाबूराव तेटगुरे यांनी रेल्वे पायलट होण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. ते स्वप्न सत्यातही उतरविले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. प्रिया यांनी आपले शिक्षण रत्नागिरीत पूर्ण केले. त्यांनी इंजिनिअरींगचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर रेल्वे इंजिन चालविण्याचे प्रशिक्षण वर्षभर घेतले. त्यांचे हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर 'कोकण कन्या' ही एक्स्प्रेस गाडी चालविण्याचा मानही मिळाला. एका 'कोकण कन्ये'ला 'कोकण कन्या' एक्स्प्रेस गाडी चालविण्यासाठी मिळणे हाही योगायोग म्हणावा लागेल.
#आंतराष्ट्रीयमहिलादिवस । कोकण रेल्वेची आणखी एक महिला सारथी, 'कोकण कन्या' प्रिया तेटगुरे । प्रिया या आता यापुढे कोकण रेल्वेच्या सहाय्यक पायलट (Assistant Loco Pilot) म्हणून असणार आहे. #InternationalWomenDay2020 pic.twitter.com/a7e0NnbLbx
— ZEE २४ तास (@zee24taasnews) March 7, 2020
प्रिया तेटगुरे यांना रायगड जिल्ह्यातील माणगावच्या कन्या. कोकण रेल्वेत नोकरीची संधी मिळाल्यानंतर रत्नागिरी मुख्य कार्यालयात त्या रुजू झाल्यात. त्यानंतर त्यांना रेल्वे चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यांनी ते वर्षभरात पूर्ण केले. दरम्यान, तिचे वडील माणगाव रेल्वेस्थानकात बुकिंग क्लार्क म्हणून रेल्वेच्या सेवेत कार्यरत आहेत. आपली मुली लोको पायलट झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावरही मोठा आनंद दिसून येत आहे. अनेकांनी त्यांचे अभिनंदनही केले आहे.
सर्वच क्षेत्रात महिला या आघाडीने पुढे येत आहेत. अनेक क्षेत्रात चमकदार कामगिरी करत आहेत. त्यांनी स्वत:ला सिद्धही केले आहे. कोकण रेल्वे चालविणे तसे आव्हानात्मक होते. मात्र, आपण हे आव्हान यशस्वीपणे पूर्ण केले आहे. पुढील आव्हान आपण पेलणारच, असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या जिद्दीला 'महिला दिनी' सलाम.