प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : कोल्हापूरच्या (Kolhapur) करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर (Ambabai Temple) परिसरात असणाऱ्या एका चप्पल स्टँड (Slipper Stand) चालकाने ग्राहकाकडून जास्तीचे आलेले पैसे द्यायला नकार दिल्याने गोंधळ झाला. जास्तीचे पैसे ट्रान्सफर (Transfer) झाल्यानंतर हे पैसे मागायला तो भाविक आणि पोलीस गेले, तेव्हा चप्पल चालकांने पोलिसाला शिवीगाळ करत थेट कपडे काढत पोलीस स्टेशनमध्ये पोहचला. पोलीस स्टेशनमध्येही त्याने दंगा घातला याप्रकरणी जुना राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये चप्पल चालका विरोधात गुन्हा नोंद केलाय..
अधिकचे पैसे चुकून ट्रान्सफर झाले
कोल्हापूरच्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात बिहार राज्यातून एक उच्च शिक्षित दाम्पत्य देवीच्या दर्शनासाठी आलं होतं. यावेळी या दाम्पत्यानी मंदिर परिसरात चप्पल स्टँड चालक गणेश पाकरे यांच्या चप्पल स्टँडवर आपले चप्पल ठेवली. दर्शनानंतर चप्पल घेऊन जात असताना या दाम्पत्याने ऑनलाईन पद्धतीने 10 रुपये पाकरे यांना दिले. पण या दाम्पत्याकडून चुकून 8500 रुपयांचा आणखी एक व्यवहार (Transaction) झाला. ही गोष्ट लक्षात येताच दांपत्याने पाकरे यांच्याकडे विचारणा करत पैसे पुन्हा देण्याची विनंती केली.
पोलीस स्थानकात कपडे काढून धिंगाणा
मात्र पैसे देण्याऐवजी चप्पल स्टँड मालक गणेश पाकरेने वाद घातला. त्यामुळे दाम्पत्यानी थेट जुना राजवाडा पोलिस स्टेशन गाठत पोलिसांकडे मदत मागितली. यावेळी पोलीस ठाण्याचे अमलदार यांनी चप्पल स्टँड मालक गणेश पाकरेकडे विचारणा केली. पण पैसे परत करण्याऐवजी गणेश पाकरेने थेट पोलिसांशीच वादावादी सुरु केली. इतंकच नाही तर पोलिसांसमोरच दाम्पत्यालाही शिवीगाळ केली.
घटना सीसीटीव्हीत कैद
पोलिसांनी गणेश पाकरे पोलीस स्थानकात आणलं, तर पोलीस ठाण्यातही पोलिसांसमोर कपडे काढूनअर्धनग्न होत गणेश पाकरेने धिंगाणा घातला. यामुळे जुना राजवाडा पोलीस ठाण्यात प्रचंड गोंधळ उडाला. ही सर्व घटना ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसांच्या कामात अडथळा आणि सदर दांपत्यास शिवीगाळ केल्या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी चप्पल स्टँड मालक गणेश पाकरे विरोधात गुन्हा दाखल केला आहे. धिंगाण्याचे सर्व सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्याकडून जारी करण्यात आलं आहे.