प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : कोल्हापुरातील (Kolhapur) आजरा तालुक्यातील बहिरेवाडी येथील एका निर्दयी मुलाने आपल्या जन्मतात्या आई-वडिलांवर प्राणघातक हल्ला (Crime News) केल्याचा प्रकार समोर आला आहे. या हल्ल्यात वडिलांचा मृत्यू झाला असून आई गंभीर जखमी झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आई वडिलांवर हल्ला केल्यानंतर मुलगा हा दुसऱ्या घरात जावून निवांत झोपलेला पाहायला मिळाला. हे प्रकरण समोर आल्यानंतर पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे. हल्लेखोर मुलगा पळून जावू नये यासाठी गावकऱ्यांनी त्याला घरातच कोंडून ठेवलं. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी (Kolhapur Police) घटनास्थळी धाव घेतली आणि हल्लेखोर मुलाला ताब्यात घेतलं आहे.
मुलाचा पालकांसोबत जोरदार वाद
सचिन कृष्णा गोरुले (32, राहणार बहिरेवाडी ता. आजरा) हा आपल्या आई वडिलांसोबत हायस्कूल 6 जवळ राहत होता. सचिन कागल येथे औद्योगिक वसाहतीत काम करत होता. त्याचे लग्नही झाले होते. मात्र काही कारणास्तव त्याचा पत्नीसोबत घटस्फोट झाला होता. परिणामी त्याची मानसिक स्थिती ठीक नव्हती. यामुळे त्याचे सतत आई वडिलांसोबत भांडण होत होते. शुक्रवारी देखील संध्याकाळी सातच्या सुमारास त्याने आई वडिलांच्या सोबत भांडण उकरून काढले. सचिनचा पालकांसोबत जोरदार वाद झाला. यामध्ये आक्रमक झालेल्या सचिनने आईवर हल्ला चढवला.
आई बाहेर पडताच दरवाजा लावून घेतला अन्...
गंभीर जखमी झालेली आई कशीबशी घरातून बाहेर पडली. त्यानंतर संतापलेल्या सचिनने घराचा दरवाजा बंद करुन घेतला. यानंतर सचिनने वडील कृष्णा बाबू गोरुले (65) यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये कृष्णा यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर सचिन घराचा दरवाजा बंद करून दुसऱ्या घरात जाऊन निवांतपणे झोपला. जखमी आईने आरडाओरडा करून ग्रामस्थांना घडलेला प्रकार सांगितला.
दरम्यान, खुनाची बातमी कळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. काही ग्रामस्थांनी जखमी आईला खासगी वाहनाने उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. तर बाकीच्या ग्रामस्थांनी सचिन पळून जाऊ नये म्हणून घराचे पुढील व मागील दरवाजे बाहेरून बंद करून घेतले आणि पोलिसांना माहिती दिली. याबाबत पोलिसांना माहिती कळवताच त्यांनी घटनास्थळी धाव घेवून हल्लेखोर सचिनला ताब्यात घेतलं. त्यानंतर आता सचिनने आई वडिलांच्यावर अशा प्रकारचा हल्ला काराण्यांमध्ये नेमकं काय कारण होत याचा शोध पोलीस घेत आहेत.