Crime News : रस्ता बांधल्याचा जाब विचारला अन्... कोल्हापुरात 65 वर्षाच्या शेतकऱ्याच्या खुनाने खळबळ

Crime News : शेतकऱ्याच्या हत्येनंतर कोल्हापुरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी सात संशयितांना ताब्यात घेतले असून यामध्ये काही महिलांचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. 

Updated: Feb 17, 2023, 01:10 PM IST
Crime News : रस्ता बांधल्याचा जाब विचारला अन्... कोल्हापुरात 65 वर्षाच्या शेतकऱ्याच्या खुनाने खळबळ title=

प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : शेतीच्या (Farming) बांधावरुन होणारी भांडणे ही काही नवी नाहीत. कधी कधी ही भांडणं हाणामारीपर्यंत पोहोचतात. मात्र शेतातून रस्ता करण्याच्या वादातून एकाचा खून झाल्याचा प्रकार घडलाय. कोल्हापुरच्या (kolhapur) कागल तालुक्यातील मौजे सांगाव या गावात ही खुनाची घटना घडली आहे. शेतातून रस्ता करण्याच्या वादातून या शेतकऱ्याचा खून (Crime News) झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात कागल पोलिसांनी (kolhapur Police) सात जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मारुती हरी पाटील असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील मौजे सांगाव येथे राहणारे मृत मारुती हरी पाटील (65) यांची शेती आहे. या शेतातून संशयित आरोपी कृष्णात पाटील (वाडकर), एकनाथ केरबा पाटील, रघुनाथ कृष्णात पाटील, महादेव दत्तू पाटील, प्रकाश महादेव पाटील यांच्यासह काही जणांनी मृत मारुती पाटील यांच्या शेतातून मुरूम टाकून रस्ता करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शेतकरी मारुती हरी पाटील यांनी विरोध केला.

माझ्या शेतातून रस्ता करू नका अशी विनंती करत मारुती हरी पाटील यांनी काम थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मारुती पाटील आणि संशयित आरोपींमध्ये मोठा वाद झाला. या वादानंतर बुधवारी 15 फेब्रुवारी रोजी संशयित सात जणांनी काठी व खोराने मारुती पाटील यांना बेदम मारहाण केली. यामध्ये मारुती पाटील हे गंभीर जखमी झाले. 

जखमी झालेल्या मारुती हरी पाटील यांना जखमी अवस्थेत पाहून त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना उपचारासाठी तात्काळ कोल्हापूर जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मारुती पाटील यांच्यावर गेल्या दोन दिवसांपासून अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. पण गुरुवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मारुती पाटील यांच्या पश्चात त्यांच्या एक मुलगा, सून, नातवंडे, दोन विवाहित मुली असा परिवार आहे.

दरम्यान, कागल पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत सात जणांवर गुन्हा नोंद केला आहे. गुन्हा दाखल केलेल्या संशयित आरोपी मध्ये कृष्णात पाटील (वाडकर), एकनाथ केरबा पाटील, रघुनाथ कृष्णात पाटील, महादेव दत्तू पाटील, प्रकाश महादेव पाटील, अशी संशयित आरोपींची नावे आहेत. यामध्ये काही महिलांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.