प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : कोल्हापुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राजेंद्रनगर येथील गुंड कुमार गायकवाड याच्या खुनातील प्रमुख संशयित आरोपी अमर माने याचा कारागृहातील एक फोटो आणि वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जातानाचे काही व्हिडिओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल झाले आहेत. हा फोटो कळंबा कारागृहातील आहे की, बिंदू चौकातील जिल्हा कारागृहातील आहे, याचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा कारागृहात कैद्यांकडून मोबाइलचा खुलेआम वापर होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच कारागृह प्रशासनाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.
राजेंद्रननगर इथ गुंडांच्या दोन टोळ्यांमधील संघर्षातून कुमार गायकवाड याचा नोव्हेंबर 2022 मध्ये टाकाळा येथे चौघांनी पाठलाग करून धारदार शस्त्राने निर्घृण खून केला होता. त्या गुन्ह्यातील प्रमुख संशयित अमर माने याच्यासह चौघांना पोलिसांनी अटक केली असून, सध्या ते कळंबा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. यातील टोळीप्रमुख अमर माने याचे कारागृहातील काही फोटो आणि त्यावरून तयार केलेले व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. हे व्हिडिओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर असून, एक लाखाहून अधिक लोकांनी ते पाहिले आहेत.
थेट कारागृहात दबदबा निर्माण केल्याचा आणि विरोधकांना चिथावणी देणारा मजकूर या व्हिडीओमधून व्हायरल केला आहे. गुन्हेगारी टोळ्यांशी संबंधित असलेल्या काही तरुणांनी हे व्हिडिओ स्टेटसला लावले आहेत. व्हायरल झालेला व्हिडिओ कळंबा कारागृहातील आहे, की जिल्हा कारागृहातील आहे हे स्पष्ट झालेले नाही. या प्रकारामुळे कारागृहात कैद्यांकडून राजरोसपणे मोबाइल वापरले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत कळंबा कारागृह प्रशासनाला विचारणा केली असता, फोटो आणि व्हिडिओची तपासणी करून पुढील चौकशी केली जाईल, अशी माहिती अधिका-यांनी दिली. संबंधित फोटो कळंबा कारागृहातील नसावेत, असा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे. मात्र, या प्रकाराने खळबळ उडाली असून, कारागृह प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
दरम्यान, कोल्हापुरात गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये गँगवॉरमधून 22 वर्षीय कुमार शाहूराज गायकवाड या तरुणाची हत्या करण्यात आली होती. कुमार गायकवाड हा तरुण राजेंद्रनगर येथे राहत होता. कुमारची तीन ते चार हल्लेखोरांनी पाठलाग करून धारदार शस्त्रांनी वार करून निर्घृण खून केली होती. शहरातील डी वाय पी मॉल ते टाकाळा खण परिसरात रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास हा सगळा धक्कादायक प्रकार घडला होता.
कुमारचा एका टोळीबरोबर वाद झाला होता. या वादातूनच कुमारची हत्या झाल्याचे समोर आलं होतं. रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास कुमार डीवायपी मॉलजवळ थांबला होता. काही वेळात तीन ते चार तरुण कुमारजवळ पोहोचले, आणि जुन्या प्रकरणावरून त्याच्याशी वाद घालू लागले. कुमार आणि त्या तरुणांमध्ये वाद सुरू होताच कुमारने पळ काढण्याचा प्रयत्न केला. उड्डाणपुलाकडून तो टाकाळा खणीच्या दिशेने पळत सुटला, त्याचवेळी तीन ते चार हल्लेखोरांनी कोयता आणि एडक्याने त्याच्यावर पाठलाग करून हल्ला चढवला. चेहऱ्यावर, हातावर आणि छातीवर 18 ते 20 वार केले. जमिनीवर कोसळलेल्या कुमारच्या डोक्यात दगड घातला.