किरिट सोमय्या यांना कराड येथे रोखलं; कोल्हापूरला जाण्यास पोलिसांचा मज्जाव

भाजपनेते किरिट सोमय्या यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यासंबधी आज ते कोल्हापूर दौऱ्यावर निघाले होते.

Updated: Sep 20, 2021, 08:11 AM IST
किरिट सोमय्या यांना कराड येथे रोखलं; कोल्हापूरला जाण्यास पोलिसांचा मज्जाव title=

कराड : भाजपनेते किरिट सोमय्या यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यासंबधी आज ते कोल्हापूर दौऱ्यावर निघाले होते. परंतु कोल्हापूरच्या हद्दीत पोहचण्याआधीच सोमय्या  यांना पोलिसांनी कराड येथे रोखले आहे. त्यामुळे या घडामोडींना नाट्यमय वळण मिळाले आहे.

मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कथित घोटाळ्याविषयी अधिक माहिती तसेच तक्रार नोंदवण्यासाठी किरिट सोमय्या यांनी कोल्हापूर दौऱ्याचे नियोजन केले होते. कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात कलम 144 लागू केल्याने मुंबईतील सीएसएमटी स्टेशनवर पोलिसांनी सोमय्या यांना कोल्हापूरकडे जाण्यास मज्जाव केला. तरी त्यांनी आपला दौरा सुरू केला. ठाणे, कल्याण, लोनावळा, पुणे येथे भाजप कार्यकर्त्यांनी सोमय्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली.

महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूरकडे निघालेल्या सोमय्या यांना कराड रेल्वे स्टेशनवर उतरवण्यात आले. आणि मोठ्या पोलीस बंदोबस्तात त्यांना कराड येथील शासकीय विश्रामगृहात हलवण्यात आले. सोमय्या याप्रकरणी सकाळी 9 वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याची देखील माहिती समोर आली आहे.