Karnataka Assembly Election Result: कर्नाटक विधानसभेत 130 हून अधिक जागा मिळवत काँग्रेसनं निर्विवाद यश मिळवलंय. आता चर्चा आहे ती मुख्यमंत्रीपदाची.. या विजयात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार (DK Shivakumar) आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांचा मोलाचा वाटा आहे. भाजपला पराभूत करण्यासाठी या दोन्ही नेत्यांनी अक्षरश: जिवाचं रान केलं. त्यामुळेच आता या दोघांपैकी मुख्यमंत्रिपदाची (CM of Karnataka) माळ कुणाच्या गळ्यात पडणार याचीच उत्सुकता सर्वांना लागलीय.
सिद्धरामय्या हे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री असून त्यांच्या नावाला पक्षात पहिली पसंती असू शकते अशी चर्चा आहे. 2013 मध्ये काँग्रेसला १२२ जागा मिळाल्या आणि सिद्धरामय्या मुख्यमंत्री झाले. त्यानंतर काँग्रेसनं 2018ची निवडणूक सिद्धरामय्यांच्या नेतृत्वात लढवली. मात्र काँग्रेसला ७८ जागांवर समाधान मानावं लागलं. दीर्घ अनुभव आणि त्यांना असलेला कोरबा समाजाचा पाठिंबा पाहता २०२४च्या लोकसभा निवडणुकांसाठी सिद्धरामय्यांचं नेतृत्व महत्त्वाचं ठरू शकतं. तर दुसरीकडे त्यांना मुख्यमंत्रिपदाची संधी दिल्यास लिंगायत आणि वोक्कालिगा समुदाय नाराज होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे सिद्धरामय्या यांच्यानंतर मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत डीके शिवकुमार यांचं नाव आघाडीवर आहे.
काँग्रेसचे निष्ठावंत आणि संकटमोचक अशी डीके शिवकुमार यांची ओळख आहे. वोक्कालिगा समाजाचे असलेले डीके शिवकुमार हे 8 वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. विविध राज्यांमधल्या सत्तासंघर्षात काँग्रेस आमदारांना कर्नाटकात सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी नेहमीच शिवकुमार यांच्यावर असते.
कर्नाटकातले सर्वात श्रीमंत उमेदवार अशीही त्यांची ओळख आहे. मात्र त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची सूत्र सोपवल्यानंतर काँग्रेसनं ऐतिहासिक विजय मिळवल्यानं त्यांची दावेदारी प्रबळ मानली जात आहे. मात्र मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात 2019 साली त्यांना तिहार जेलमध्ये तीन महिन्यांचा कारावासही भोगावा लागलाय. त्यामुळे त्यांना लगेचच संधी दिली जाणार का याबाबत शंका आहे.
सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार हे दोघेही तुल्यबळ नेते आहे. त्यामुळे त्यांच्यापैकी कुणाच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ टाकायची हा मोठा प्रश्न पक्षश्रेष्ठींसमोर असणारंय. दुसरीकडे या दोघांना अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद दिलं जाऊ शकतं अशीही चर्चा आहे. तर काँग्रेसचे अध्यक्ष असलेले कर्नाटकातले ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खरगेंकडेही डार्क हॉर्स म्हणून पाहिलं जातंय. आता या सगळ्यात कोण बाजी मारतं हेच पाहणं महत्त्वाचं ठरेल.