मुंबई : राज्यात आता कोरोना संसर्गाची परिस्थिती ही नियंत्रणाबाहेर जात असल्याचं चित्र आहे. अनेक शहरांमध्ये आज मोठी वाढ झाली आहे. शासनाने राज्यात नवे निर्बंध लागू केले आहेत. पण त्याआधी आज ही मोठी वाढ पाहायला मिळाली.
कल्याण-डोंबिवलीत क्षेत्रात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळाला आहे. कल्याण-डोंबिवली क्षेत्रात आज सर्वाधिक 1693 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर अजूनही 10308 रुग्ण उपचार घेत आहेत. तर एका दिवसात 981 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. गेल्या 24 तासात 3 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
नवी मुंबईत देखील अशीच परिस्थिती आहे. नवी मुंबईतही आज कोरोना रुग्णांचा उच्चांक नोंदवला गेला आहे. नवी मुंबईत 1441 रुग्ण आढळले आहेत. तर 518 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. शहरात एकूण कोरोना रुग्णांचा आकडा 70103 वर गेला आहे. आज 3 जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 1189 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 60218 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
पिंपरी-चिंचवड मध्ये ही कोरोनाचा कहर पाहायला मिळतो आहे. कारण इथे पहिल्यांदाच 3 हजारांचा आकडा पार झाला आहे. आज शहरात 3 हजार 382 रुग्णांची भर पडली असून गेल्या 24 तासात 18 जणांचा मृत्यू झाला आहे.