आतिष भोईर, झी मीडिया, कल्याण : परदेशातून आलेल्या एका व्यक्तीचा omicron पॉझिटिव्ह रिपोर्ट आणि डिस्चार्ज एकाच दिवशी आल्याचा प्रकार कल्याण-डोंबिवली महानगर पालिके घडला आहे.
3 डिसेंबरला नायजेरीतून चार जणांचं कुटुंब कल्याण-डोंबिवलीत आलं. त्यांची कोरोना चाचणी केल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आढळल्याने त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले. त्याबरोबरच त्यांच्या स्वॅबचे नमुने जिनोम सिक्वन्सिंगसाठी लॅबमध्ये पाठवण्यात आले होते. या चौघांनाही केडीएमसीच्या कोव्हिड सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं होतं.
चौघांमध्ये एक 6 वर्षाची मुलगी आणि एक 10 वर्षांचा मुलगा आहे. तर पती-पत्नी या दोघांचंही लसीकरण पूर्ण झालं आहे.
या चारही रुग्णांची प्रकृतची स्थिर होती. पंधरा दिवसांनंतर या रुग्णांची पुन्हा आरटीपीआर टेस्ट करण्यात आली, त्याचा अहवाल निगेटिव्ह आला. त्यामुळे या चौघांनाही डिस्चार्ज देण्यात आला. या चौघांनाही सात दिवसांच्या होम क्वारंटाईनच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
मात्र, आज संध्याकाळी या चौघांमधील 45 वर्षीय व्यक्तीला ओमायक्रॉनची लागण झाल्याचा अहवाल केडीएमसी प्रशासनाकडे प्राप्त झाला. रुग्णाची प्रकृती स्थिर असून डॉक्टर त्याच्या तब्येतीवर लक्ष ठेऊन आहेत.
या जारही जणांचे नमुने 4 डिसेंबरला पाठवण्यात आले होते. पण त्याचा अहवाल तब्बल 15 दिवसांनी प्राप्त झाला. अहवालासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने ओमायक्रोन रोखणार तरी कसा? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
या कुटूंबाचे 24 हाय रिस्क आणि 62 लो रिस्क कॉन्टेक्ट अशा 86 लोकांचं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केलं असता त्यातील 4 निकट सहवासीत कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यांना महापालिकेच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेले असून त्यांना कुठल्याही प्रकारची लक्षणे नसून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.