Kalyan Crime News: कल्याण तालुक्यातील वरप गावात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दादर स्थानकात सुटकेसमध्ये मृतदेह आढळल्यानंतर आता वरप येथेही बॅगेत मृतदेह आढळला आहे. एका अज्ञात व्यक्तीचा मृतेदह बॅगेत भरुन कचरा कुंडीत फेकून देण्यात आला होता. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
वरप परिसरातील गावदेवी मंदिर भागात स्थानिकांना ही बॅग दिसली होती. त्यानंतर रहिवाशांना संशय आल्याने त्यांनी या संदर्भात पोलिसांना माहिती दिली. पोलिस घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी ही बॅग उघडून बघितली तेव्हा त्यांनादेखील धक्काच बसला. या बॅगेत एका वृद्ध व्यक्तीचा मृतदेह होता. अज्ञात मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती.
वृद्ध व्यक्तीची हत्या करुन पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने ही बॅग कचऱ्यात फेकण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कल्याण ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल करून या संदर्भात तात्काळ तपास सुरू केला आहे .तर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आणि डॉग स्कॉडने हा परिसर पिंजून काढला आहे.
दरम्यान ही व्यक्ती कोणाच्या ओळखीची असेल किंवा मिसिंग असेल तर तात्काळ पोलिसांसोबत संपर्क साधावा, असा आवाहन करण्यात आलंय. अंगाने मध्यम बांधा असलेल्या सावळ्या रंगाच्या या वृद्धाची उंची साधारण 5 फूट 5 इंच इतकी आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली. तसंच, या वृद्धाच्या परिचितांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असं अवाहनदेखील करण्यात आलं आहे.
पोलिसांनी वृद्धाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. तसंच, वृद्धाची हत्या कोणी केली याचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही तपासून ही सुटकेस कोणी टाकली याचा शोध घेतला जात आहे.
दादर रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक ११ येथे एक अनोळखी व्यक्ती एक मोठी ट्रॉली बॅग घेऊन जात होता. गस्तीवर असलेले रेल्वे सुरक्षा दलाचे जवान संतोषकुमार यादव यांना त्याच्याव संशय आल्यामुळे त्यांनी त्या व्यक्तीला थांबवून त्याची बॅग तपासली असता त्यात रक्ताने माखलेला मृतदेह होता. तपासणी तो मृतदेह अर्शद अली सादीक अली शेख (३०) याचा असून तो सांताक्रुझ कलिना परिसरातील रहिवासी असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतलं असून दोघे आरोपी मुकबधिर आणि अपंग आहेत. त्यांनीच पायधुनी येथे मित्र अर्शद खान याची हत्या करुन मृतदेह बॅगेत टाकला, असे समोर आले आहे. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी ते तुतारी एक्स्प्रेसमधून नेत होते. प्रवासात एखाद्या पुलावरुन ही बॅग ढकलण्याचा त्यांचा प्लान होता