काकडे, खडसे का फडणवीस? राज्यसभेसाठी भाजपचा तिसरा उमेदवार कोण?

राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत गुरुवारी संपत आहे. 

Updated: Mar 11, 2020, 11:33 PM IST
काकडे, खडसे का फडणवीस? राज्यसभेसाठी भाजपचा तिसरा उमेदवार कोण? title=

मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत गुरुवारी संपत आहे. असं असताना शरद पवार वगळता एकही अर्ज दाखल झालेला नाही. कारण महाविकास आघाडी आणि भाजपमधील गोंधळाची स्थिती कायम आहे. मुदत संपण्याच्या आदल्या दिवशी, म्हणजे बुधवारी केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा अर्ज दाखल झालाय.

राज्यात एकूण ७ जागा रिक्त होत असून विधानसभेतलं संख्याबळ पाहता आघाडीचे चार तर भाजपचे ३ खासदार निवडून येऊ शकतात. आघाडीच्या चारपैकी दोन जागा राष्ट्रवादीकडे जाणार असल्याचं सांगितलं जात होतं. त्यासाठी फौजिया खान यांचं नावही निश्चित झालं होतं. असं असताना बुधवारी खान यांनी अर्ज भरलाच नाही. याचं कारण सांगितलं जातंय काँग्रेसचा चौथ्या जागेवरील दावा.

आता आघाडीच्या समन्वय समितीमध्ये चौथं नाव निश्चित केलं जाईल, असं सांगितलं जातंय, मात्र यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील मतभेद समोर आलेत. मुदत संपत आली असताना शिवसेना आणि काँग्रेसची नावंही अद्याप गुलदस्त्यात असताना भाजपमध्येही गोंधळाची स्थिती कायम असल्याचं दिसतंय.

बुधवारी संध्याकाळी भाजपनं दोन नावं जाहीर केली. विद्यमान राज्यसभा खासदार आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची सीट कायम राहिलीये. तर लोकसभा पोटनिवडणुकीत पराभूत झालेल्या उदयनराजेंना दिलेलं आश्वासन भाजपनं पूर्ण केलंय. तिसऱ्या जागेचा निर्णय मात्र अद्याप झालेला नसल्याचं दिसतंय.

भाजपचे सहयोगी अपक्ष खासदार संजय काकडे यांचा पत्ता कट होतो की त्यांना पुन्हा राज्यसभेत पाठवलं जातं याची उत्सुकता आहे. विधानसभेला तिकीट कापलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचंही नाव चर्चेत आहे. तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत पाठवायचं असेल, तर तिसऱ्या जागेवर त्यांची वर्णी लागू शकेल.

गुरूवारी अर्ज दाखल करायची अंतिम मुदत असल्यानं आघाडी आणि भाजपला निर्णयाची घाई करावी लागणार आहे. अर्थात, त्यानंतर होणारे रुसवे-फुगवेही सांभाळावे लागतील.