नवी मुंबई : उरण, जेएनपीटी (जवाहरलाल नेहरू पोर्ट कंटेनर टर्मिनल) बंदरात एक विचित्र अपघात झाला. ट्रक ट्रेलर ड्रायव्हरसह जेटीवरून थेट समुद्रात पडला आहे. बुधवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातातील चालक गुरूवार संध्याकाळपर्यंत सापडला नाही. जॅकी सिंग (३०) असे या चालकाचे नाव आहे. तो मूळचा जम्मू काश्मीर येथील आहे. जेएनपीटी येथे बर्थ क्रमांक एकवर हा अपघात झाला.
चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने संरक्षक कठडा तोडून ट्रेलर थेट समुद्रात पडला. जेडब्लूसी कंपनीचा हा ट्रेलर जेएनपीटी मध्ये कंटेनर भरण्यासाठी जेएनपीटीमध्ये आला होता. मात्र हा ट्रेलर चालकासह समुद्रात पडला. चालक जॅकी सिंग याला आणि ट्रेलर शोधण्याचे काम उशिरापर्यंत सूरू होते. मात्र चालक जॅकी सिंग सापडू शकला नाही.
आंतराष्ट्रीय बंदर अशी ख्याती असलेल्या जेएनपीटी बंदरात अशा प्रकारचा अपघात होणे याच आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे जेएनपीटीच्या सुरक्षीततेच्या उपाययोजनांबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे. यापूर्वी देखील बीएमसीटी बंदरात जेट्टीला एक महाकाय जहाज धडकले होते. याबाबत न्हावाशेवा पोलीस ठाण्याचे उपनिरिक्षक सुहास पाटील हे अधिक तपास करत आहेत. या प्रकरणी अद्याप कोणावरही गुन्हा दाखल झाला नसल्याचे त्यांनी सांगितले.