मंत्रीमंडळ बैठकीत संतापलेल्या जयंत पाटील यांच्या जलसंपदा विभागाच्या प्रकल्पांना अखेर मंजूरी

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत  12 मे रोजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यावर संतापले होते

Updated: May 19, 2021, 02:29 PM IST
मंत्रीमंडळ बैठकीत संतापलेल्या जयंत पाटील यांच्या जलसंपदा विभागाच्या प्रकल्पांना अखेर मंजूरी title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत  12 मे रोजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यावर संतापले होते. मंत्रीमंडळ बैठकीत जलसंपदा विभागाचा प्रस्ताव मंजूर होऊन त्याचे मिनिट्स मंजूर करण्यात आले होते, असे असताना ती फाईल वित्त विभागाकडे पाठवल्याने जयंत पाटील यांनी जाहीरपणे मुख्य सचिवांबद्दल नाराजी व्यक्त केली होती.

मंत्रीमंडळ बैठकीत मंजूर झालेल्या जलसंपदा विभागाच्या कामांची फाईल मुख्य सचिवांनी पुन्हा एकदा वित्त विभागाकडे पाठवली, त्यांनी असे का केले? हा प्रश्न  जयंत पाटील यांना पडला. यासाठी त्यांनी नाराजीही व्यक्त केली. त्याच बरोबर मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजूर झालेल्या गोष्टी अशा अचानक बदलंत असतील तर, मंत्रीमंडळाच्यावर कोण आहे का? असा प्रश्न जयंत पाटील यांनी उपस्थित केला होता.

यासगळ्या प्रकारानंतर जलसंपदा विभागाच बंद करून टाका, असे संतप्त विधानही जयंत पाटील यांनी केले होते. त्यानंतर मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि जलसंपदा विभागाचे सचिव यांच्यात बैठक झाली. ज्या 70 जलसिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता मंत्रिमंडळाने दिली होती त्यांना मंजूर करण्यात आले.  त्यामुळे या प्रकल्पांना अखेर आता मंजूरी मिळाली आहे.

त्यामुळे महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर मंत्री विरुद्ध प्रशासनातील अजून एक वाद आता शमला आहे.