दीपक भातुसे, झी मीडिया, पुणे : राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे, थोड्याच वेळात जयंत पाटील यांच्या नावाची अधिकृत घोषणा होणार असल्याचंही सांगण्यात येत आहे. सुनील तटकरे यांच्यानंतर जयंत पाटील हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष होणार आहेत. राष्ट्रवादीचा राजकारणात सध्या पडता काळ आहे. यातून पक्षाला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे कसे बाहेर आणतील हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे.जयंत राजाराम पाटील हे सांगलीचे आहेत, जयंत पाटलांचे वडील राजारामबापू पाटील यांच्याप्रमाणे, जयंत पाटील यांची प्रतिमा अभ्यासू नेता अशी आहे.
पक्षाला सध्या कोणत्याही वादात न अडकलेला नेता, प्रदेशाध्यक्षपदी विराजमान करायचा होता, त्याप्रमाणे जयंत पाटील यांचे नाव आतापर्यंत कोणत्याही वादात अडकलेले नाही, आपल्या भाषणाच्या अनोख्या शैलीतून सरकारची कोंडी करण्यात त्यांचा हातखंडा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचं पश्चिम महाराष्ट्राचं वर्चस्व आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पश्चिम महाराष्ट्रातील, पक्षाचे विधानसभेतील नेते अजित पवार पश्चिम महाराष्ट्रातील, विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे देखील पश्चिम महाराष्ट्रातील आहेत. राष्ट्रवादीवर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठा नेत्यांचं वर्चस्व आहे. म्हणून राष्ट्रवादीला मराठ्यांचा पक्ष म्हणून देखील हिनवलं जातं.