Jalgaon LokSabha Constituency : जळगाव... मराठा सरदार तुळाजीराव भोईटे यांनी जळगाव शहराची स्थापना केली. सोनं, केळी, कापूस आणि कडधान्याचं हे प्रमुख व्यापारी केंद्र... ख्यातनाम कवयित्री बहिणाबाई चौधरी आणि ख्यातनाम निसर्गकवी बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांची जन्मभूमी... अहिराणी या मराठीच्या बहिणभाषेचं माहेरघर... ठिबक सिंचनासाठी प्रसिद्ध असलेल्या जैन इरिगेशनची कर्मभूमी... मात्र एवढं मोठं शहर असूनही जळगाव विकासाच्या बाबतीत पिछाडीवरच आहे.
जळगाव... समस्यांचं गाव
केळी आणि कापूस ही प्रमुख पिकं असतानाही त्यावर आधारित उद्योग इथं नाही. जळगावात सिंचनाचे मोठे प्रकल्प नाहीत. त्याचबरोबर तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत. अनेक तरुणांना नोकरीसाठी मुंबई आणि पुण्यात स्थलांतरीत व्हावं लागतं. तीन मुख्य रेल्वे स्थानकं असूनही अनेक महत्त्वाच्या गाड्यांना इथं थांबा नाही, त्यामुळे प्रवास देखील जळगावसाठी अवघडच झालाय.
जळगावचं राजकीय गणित
जळगाव मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला... 1999 पासून वाय. जी. महाजन, हरिभाऊ जावळे, ए. टी. पाटील आणि उन्मेष पाटील यांनी भाजपच्या विजयाची परंपरा कायम ठेवली. 2009 मध्ये भाजपच्या ए. टी. ऊर्फ नाना पाटलांनी राष्ट्रवादीच्या वसंतराव मोरेंचा 96 हजार मतांनी पराभव केला. 2014 मध्ये त्यांनी दुस-यांदा राष्ट्रवादीच्या डॉ. सतीश पाटलांना पावणे चार लाख मतांनी पाणी पाजलं. 2019 मध्ये भाजपनं उन्मेष पाटलांना मैदानात उतरवलं. त्यांनी राष्ट्रवादीच्या गुलाबराव देवकरांचा तब्बल 4 लाखाहून अधिक विक्रमी मताधिक्यानं धुव्वा उडवला. विधानसभेचा विचार केला तर जळगावातून शिवसेनेचे 3, भाजपचे 2 आणि राष्ट्रवादीचा 1 आमदार निवडून आलाय.
यावेळी भाजपनं विद्यमान खासदार उन्मेष पाटलांचं तिकीट कापलं आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली. त्यामुळं भाजपात मोठी नाराजी पसरलीय. उन्मेष पाटलांनी तर भाजपला रामराम ठोकून बंडाचा झेंडा फडकवला. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेचं शिवबंधन हाती बांधलं. मात्र उमेदवारीची माळ करण पवार यांच्या गळ्यात पडली. या घडामोडीनंतर आता भाजपमध्येही वेगवान हालचाली सुरू झाल्यात. स्मिता वाघ यांना दिलेली उमेदवारी बदलण्यात येणार असल्याची चर्चा रंगलीय.
दरम्यान, जळगावच्या राजकारणात फारच वेगवान घडामोडी घडत आहेत. उन्मेष पाटलांच्या रुपानं महाराष्ट्रात कधी नव्हे ती भाजपमध्ये पहिली बंडखोरी झाली. तर आता एकनाथ खडसेंना पुन्हा स्वगृही म्हणजे भाजपमध्ये सामील करून घेतलं जातंय. या सगळ्याचा परिणाम जळगावच्या निवडणुकीवर होणार, एवढं नक्की..!