Jalgaon Lok Sabha Election 2024 : भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील (Unmesh Patil) आणि पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार (Karan Pawar) यांनी कार्यकर्त्यांसह ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. यामुळे जळगावात भाजपला मोठं खिंडार पडलंय. उमेदवारी, पदासाठी मी प्रवेश केला नसून, कार्यकर्त्यांचा स्वाभिमान जपण्यासाठीच भूमिका घेतल्याचं पाटलांनी म्हटलंय. विकास करूनही माझ्याविरोधात बदल्याच्या भावनेचं राजकारण रुजवलं गेल्याची खंत पाटलांनी बोलून दाखवली, तर फसगत करणाऱ्यांना यापुढे निवडून द्यायचं नाही. यापुढे जळगावात छत्रपतींचा भगवा भडकवायचा असा निर्धार उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) केलाय. उन्मेष पाटील यांनी हाती शिवबंधन बांधल्याने आता जळगाव (Jalgaon LokSabha) लोकसभेच्या भाजप उमेदवार स्मिता वाघ यांनी उन्मेष पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडलंय.
काय म्हणाल्या स्मिता वाघ?
माझा विकासावर विश्वास जो काही विकास केंद्र सरकारने व राज्य सरकारने विकास केला आहे ते जनता ओळखते असं म्हणत विकासाच्या मागे जनता राहील भाजपचा उमेदवार स्मिता वाघ यांनी विश्वास व्यक्त केला आहे. प्रत्येकाला वैयक्तिक व्यक्ती स्वातंत्र्य आहे त्यातूनच उन्मेष पाटील यांनी निर्णय घेतला असावा, मात्र भाजपने जसं मला कधीही कमी केलेलं नाही तसं उन्मेश पाटील यांनाही पक्षाने कधी कमी केलेला नाही. आज जरी उन्मेष पाटील तिकडे गेले असले तरी शरीराने ते तिकडे गेले असून मनाने मात्र ते आजही भाजपशी जुळून असल्याचा विश्वास स्मिता वाघ यांनी व्यक्त केला आहे. 2019 लोकसभा निवडणुकीत ऐनवेळी स्मिता वाघ यांचे तिकीट कापून उन्मेश पाटील यांना देण्यात आले होते मात्र यावेळी उन्मेष पाटील यांचे तिकीट पक्षाने कापल्याने ते नाराज होते. त्यामुळे आता उन्मेष पाटील हे स्मिता वाघ यांच्या विरोधात राहणार असून असं असलं तरी निवडणुका ही युद्धभूमी असून आम्हीही आमच्या परीने युद्ध लढू, असं आव्हान देखील स्मिता वाघ यांनी म्हटले आहे.
भाजपला माझ्या कामाची किंमत नाही, एका भावाने दगा दिला असला तरी, दुसरा भाऊ शिवसेना माझ्यासोबत आहे, असा विश्वास मला आहे. त्यामुळे आता मी शिवसेना ठाकरे गटात सामील होतोय, असं उन्मेष पाटील यांनी म्हटलं आहे. उन्मेष पाटील हे जळगाव लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान भाजप खासदार आहेत. याआधी उन्मेष पाटलांनी 2014 मध्ये आमदारकीची निवडणूक लढवली होती. चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात आमदार देखील राहिले होते.
दरम्यान, आज संध्याकाळी शरद पवारांच्या निवासस्थानी सिल्व्हर ओकवर महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. शरद पवार, बाळासाहेब थोरात, संजय राऊत तसंच मविआचे इतर नेते या बैठकीला उपस्थित राहतील. मविआतला जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी ही बैठक होणार आहे. मविआच्या 9 जागांचा तिढा अजूनही कायम आहे. उत्तर मध्य मुंबई, उत्तर मुंबई, भिवंडी, सातारा, माढा, रावेर, धुळे, जालना आणि नांदेड या जागांवर उमेदवार कोण असणार याचा निर्णय आजच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे.