फर्जी! हमालाने युट्यूबवर व्हिडीओ पाहून छापल्या नोटा; 3 तास गुंगारा दिला पण शेवटी...

Jalgaon Crime : रातोरात श्रीमंत होण्याकरता हमालाने लढवलेली शक्कल त्याच्या अंगलट आली आहे. पोलिसांनी नकली नोटा झापणाऱ्या संशयिताला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून 1 लाख 69 हजारांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत

Updated: Mar 3, 2023, 02:34 PM IST
फर्जी! हमालाने युट्यूबवर व्हिडीओ पाहून छापल्या नोटा; 3 तास गुंगारा दिला पण शेवटी... title=

Crime News : अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि विजय सेतुपथी यांची फर्जी (Farzi) ही वेबसीरिज सध्या धुमाकूळ घालतेय. अॅमेझॉन प्राइमवर रिलीज झालेली ही सीरिज प्रेक्षकांना प्रंचड आवडली आहे. 'फर्जी'ची कथा बनावट नोटांच्या व्यवसायाभोवती फिरते. शाहिद कपूर यामध्ये सनीची भूमिका साकारत आहे, जो त्याच्या आजोबांच्या बंद असलेल्या प्रिंटिंग प्रेसमध्ये बनावट नोटांचा व्यवसाय सुरू करतो. या चित्रपटासारखाच काहीसा प्रकार जळगावमध्ये घडलाय.

जळगाव (Jalgaon News) येथील कुसुंबा परिसरात उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित व रामानंद पोलिसांच्या पथकाने छापा टाकून बनावट नोटा तयार करणाऱ्याला ताब्यात घेतले आहे. देविदास आढाव असे या संशयीताचे नाव असल्याचे समोर आले आहे. तो हमालीचे काम करत होता. देविदास आढाव याच्याकडून पोलिसांनी 100, 200 व 500 च्या 1 लाख 69 हजारांच्या बनावट नोटा व प्रिंटर  पोलिसांनी जप्त केले आहे. 

देविदास आढाव हा युट्यूबच्या माध्यमातून व्हिडिओ पाहून प्रिंटरद्वारे या बनावट नोटा तयार करत होता. देविदास आढाव हा 50 हजार रुपयांमध्ये दीड लाखांच्या बनावट नोटा देत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

कशी झाली अटक?

जळगाव जिल्ह्यात काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात नकली नोटा आल्याचे पाहायला मिळत होते. जळगाव पोलिसांनीही काही दिवसापूर्वी देखील बनावट नोटा पोलिसांनी पकडल्या होत्या. बुधवारी पोलीस कर्मचाऱ्याला एक व्यक्ती बनावट नोटांची छपाई करून विक्री करत असल्याबाबत माहिती मिळाली होती. पोलीस कर्मचाऱ्याने ही माहिती जळगाव उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांना दिली. गावीत यांच्या पथकाने कुसुंबा परिसरात सापळा रचून देविदास आढाव याला ताब्यात घेतले.

उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांनी आढाव याला ताब्यात घेण्यासाठी कुसुंबा परिसरात सापळा रचला होता. गावीत यांच्या पथकातील एका कर्मचाऱ्याने आढावकडे नकली नोटांसाठी संपर्क साधला. त्यानंतर देविदास आढावने त्या पोलीस कर्मचाऱ्याला नकली नोटा घेण्यासाठी एका ठिकाणी बोलवले. देविदासकडे पोलीस कर्मचाऱ्याने तीन लाखांच्या नकली नोटांची मागणी केली होती. संशय आल्याने आढाव याने सुरुवातीला पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला. सुमारे तीन तासांनंतर त्याने गावाबाहेर पोलीस कर्मचाऱ्याला बोलवले. यानंतर दोन अधिकाऱ्यांनी तिथे जात आढाव याच्याकडून नोटा घेतल्या. त्यानंतर इतर अधिकाऱ्यांनी धाव घेत आढाव याला ताब्यात घेतले.