'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' म्हणत आले आणि 390 कोटी घेऊन गेले, जालनात आयकर विभागाच्या धाडीची Inside Story

जालन्यात 'राहुल वेड्स अंजली' आयकर विभागाचं वऱ्हाड, 390 कोटीचं घबाड

Updated: Aug 11, 2022, 05:44 PM IST
'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' म्हणत आले आणि 390 कोटी घेऊन गेले, जालनात आयकर विभागाच्या धाडीची Inside Story title=

योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : आयकर विभागाच्या (Income tax) नाशिक अन्वेषण व शोध (डिटेक्शन) विभागांतर्गत जालना (Jalana) इथल्या चार बड्या कारखानदारांनी स्टील उत्पादनात कोट्यवधी रुपयांचे व्यवहार केले होते. हे व्यवहार रोख स्वरुपात करून बक्कळ कमाई केल्याचा आणि या व्यवहारातून आयकर बुडवल्याचा संशय आयकर विभागाला होता. 

जालन्यातील कारखानदारांच्या घरी आणि कारखान्यात छापे टाकले असता 390 कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता मिळून आली आहे. विशेष म्हणजे या व्यवहाराशी संबंधित औरंगाबादचा एक बांधकाम व्यवसायिक आणि केटरर्स कंपनी आता रडारवर आहे

राज्यात सर्वाधिक लोखंडी गज ( steel company) तयार करणारे कारखाने जालना (jalna) इथं आहे. इथून राज्यातील बांधकाम व्यावसायिकांना लोखंडी गज पुरवले जातात. जालन्यामधील चार कारखानदारांनी कर बुडविल्याची माहिती औरंगाबाद इथल्या प्राप्तीकर विभागाच्या पथकाला मिळाली होती. 

याची माहिती नाशिक इथल्या मुख्य कार्यालयाला कळविण्यात आली होती. यानंतर नाशिकचं पथक आणि औरंगाबादमधलं स्थानिक पथकाच्या मदतीने जालन्यात 1 ऑगस्टला कारखानदारांच्या निवासस्थानी आणि कार्यालयात छापे टाकले. मात्र या कारवाईत कुठेही संशयास्पद काहीही मिळून आले नाही.

असा टाकला छापा
या छाप्या करिता मुंबई, पुणे, ठाणे नाशिक च्या दोनशेहून अधिकाऱ्यांना बोलावण्यात आलं होतं. शंभराहून अधिक कारमध्ये हा सर्व ताफा जालण्याकडे रवाना झाला. कारखानदारांना किंवा संबधितांना या छाप्याची कुठलीही कुणकुण लागू नये याकरिता पथकाने आपल्या वाहनांवर 'दुल्हन हम ले जायेंगे' चा स्टीकर लावले होते. संशय येऊ नये म्हणून वाहनांवर वर आणि वधूचे नाव सुद्धा लावण्यात आलं होतं.

'हाती लागलं घबाड'
प्राप्तीकर विभागाने कारखानदारांच्या घरी आणि कार्यालयात टाकलेल्या छाप्यात काहीही मिळून न आल्याने पथकाने त्यांच्या इतर ठिकाणाचा तपास केला होता. त्यात त्यांना जालना शहराबाहेर फार्म हाउस असल्याचा संशय आला. या फार्म हाउस वर छापा टाकला असता कोणालाही संशय येणार नाही अश्या प्रकारे पैसा लपवण्यात आला होता. घरातील कपाटाखाली, अडगळ पडलेल्या सामानातील पिशव्यात तसxच बिछान्यांमध्ये पैसा लपवण्यात आला होता.

इतके अधिकारी आणि कर्मचारी होते पैसे मोजायला
आयकर विभागाने केलेली ही कारवाई 1 ते 8 ऑगस्टपर्यंत चालली. या कारवाईत सुमारे 390 कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघडकीस आली. त्यात 58 कोटींची रोकड, 16 कोटीचा ऐवज यात 32 किलो सोन्याचे दागिने, हिरे, मोत्यांचा समावेश आहे. तसंच सुमारे 300 कोटींची बेहिशेबी मालमत्ता मिळून आली आहे. ही रोकड मोजण्यासाठी पूर्ण दिवसभर मोजणी सुरु होती. याकरिता 10 ते 12 नोटा मोजणी यंत्रं लावण्यात आली होती.