तीच वय होतं जादा, तरीही दामिनी पथकानं आणली लग्नात बाधा

अंगावरील हळद उतरण्याआधीच नवविवाहित जोडप्याला पोलीस अधीक्षक कार्यालय गाठण्याची वेळ आलीय. 

Updated: May 5, 2022, 06:09 PM IST
तीच वय होतं जादा, तरीही दामिनी पथकानं आणली लग्नात बाधा  title=

जालना : जालन्यातील घनसावंगी तालुक्यातील मच्छिन्द्रनाथ चिंचोली येथे एका जोडप्याचं लग्न पार पडलं. पण, या जोडप्याच्या अंगावरील हळद उतरण्याआधीच त्यांना पोलीस अधीक्षक कार्यालय गाठावं लागलं आहे.

चिंचोली गावात त्या जोडप्याचं लग्न सोहळा संपन्न होत होता. कुणी तरी या लग्नात बाधा आणण्याचा प्रयत्न केला. त्या अज्ञात व्यक्तीनं लग्नातील नवरी मुलगी १७ वर्षाची असून हा बालविवाह होत असल्याची तक्रार महिला व बालविकास विभागाकडे केली.

मिळालेल्या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी दामिनी पथकासह चाईल्ड लाईनच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लग्न सोहळा होत असलेल्या गावात धाव घेतली. यावेळी नवऱ्या मुलीच्या नातेवाईकांनी मुलीच्या वयाचे अधिकृत पुरावे दाखवले. नवरी मुलीचे वय १७ वर्ष नसून ती १९ वर्षाची आहे असे त्या नातेवाईकांनी  अधिकाऱ्यांना पटवून दिले.

मात्र, हे अधिकारी ऐकत नव्हते. अखेर सर परवाने तपासल्यानंतर अधिकारी तेथून निघाले. लग्न सोहळा पार पडला आणि नव्या नवरीसह तिच्या पालकांनी, नातेवाईकांनी थेट पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले. दामिनी पथकासह, चाईल्ड लाईनच्या अधिकाऱ्यांनी लग्न सोहळ्यात अडथळे आणले. कुटुंबियांची बदनामी केली असा आरोप मुलीच्या नातवाईकांनी केला.

तसेच, लग्नात अडथळे आणणारे दामिनी पथक, चाईल्ड लाईन आणि तक्रार करणाऱ्या अज्ञातावर कारवाई करण्याची मागणी या जोडप्यासह मुलीच्या नातवाईकांनी अतिरीक्त पोलीस अधिक्षकांकडे केलीय.