ISIS संबंध : मुंब्रा, औरंगाबादेत एटीएसचे धाडसत्र

 मुंब्रा आणि औरंगाबादमध्ये एटीएसने धाडसत्र टाकले आहे.  

Updated: Jan 22, 2019, 06:29 PM IST
ISIS संबंध : मुंब्रा, औरंगाबादेत एटीएसचे धाडसत्र  title=

ठाणे :  मुंब्रा आणि औरंगाबादमध्ये एटीएसने धाडसत्र टाकले आहे. आयएसआयएसशी संबंधावरून हे धाडसत्र सुरु आहे. एटीएसने ९ संशयितांची चौकशी सुरु केली आहे. सर्वांना ताब्यातही घेण्यात आल्याचे समजते. पण अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

ठाण्यामधील मुंब्र्यातील कौशा भागातून एटीएसने कारवाई करत तिघांना ताब्यात घेतले. तर औरंगाबाद या ठिकणी सलमान नावाचा एक तरुण पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेसाठी काम करतो आणि हाच सलमान काही दिवसापूर्वी मुंब्रा भागात या तिघांना भेटण्यासाठी गेला होता. या संशयावरून एटीएसने कारवाई केली असावी, अशी शक्यता आहे.

मजहर, मौशीम आणि फहर या तीन तरुणांना एटीएसने ताब्यात घेतले आहे. यामधील मजहर कालच औरंगाबाद या ठिकणी जाण्यास निघाला होता. मजहरच्या घरात जेव्हा एटीएसची टीम पोहोचली तेव्हा मात्र मजहर घरी नव्हता. तो औरंगाबादला गेलाय असे त्याच्या घरच्यांनी सांगितले. त्याच्या या घरातून सर्व फोन, लॅपटॉप आणि काही कागदपत्रे एटीएसने जप्त केली आहेत. आता मजहर हा एटीएसच्या ताब्यात आहे, असे बोलले जात आहे. आता या तिघांना कशासाठी ताब्यात घेतले आहे, याची चर्चा सुरु आहे. औरंगाबादच्या संघटनेशी या तिघांचा काय संबंध आहे याचा तपास सुरू आहे.