ऑस्ट्रेलियातील 'आयर्नमॅन' स्पर्धेत नाशिकच्या चौघांचा झेंडा

आत्तापर्यंत नाशिकचे आठ आयर्नमॅन, शहर 'आयर्नसिटी' म्हणून नावारूपास येईल विजेत्यांना विश्वास

Updated: Dec 4, 2019, 01:53 PM IST
ऑस्ट्रेलियातील 'आयर्नमॅन' स्पर्धेत नाशिकच्या चौघांचा झेंडा title=

किरण ताजणे, झी २४ तास, नाशिक : ऑस्ट्रेलियात पार पडलेल्या आयर्नमॅन या खडतर स्पर्धेत चौघांनी यश मिळवले आहे. त्यांचे नाशिककरांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केलंय. ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत नाशिकरांना रॅली काढली होती. ठिकठिकाणी त्यांचे स्वागतदेखील करण्यात आले. ऑस्ट्रेलियात झालेल्या 'आयर्नमॅन २०१९' या अतिशय खडतर स्पर्धेत किशोर घुमरे, प्रशांत डंबरी, महेंद्र छोरिया, अरुण गचाले यांनी सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे वेळेच्या आत यांनी ही स्पर्धा पूर्ण केलीय.

शारीरिक आणि मानसिक क्षमता सिद्ध करण्याची ही स्पर्धा असते. कठोर मेहनत आणि इच्छाशक्तीच्या जोरावर यांनी ही स्पर्धा पूर्ण करून नाशिकचीच नव्हे तर, भारताची मान उंचावलीय. थंड पाण्यात पोहणे, तुफान वाऱ्याचा सामना करणे, सायकलिंग करणे, आल्हाददायक वातावरणात धावणे असं या स्पर्धेचे स्वरूप असते. यासाठी १७ तासांचा कालावधी असतो. मात्र, यांनी वेळेच्या आतच ही स्पर्धा पूर्ण करत परदेशात भारताचा झेंडा अभिमानाने फडकवलाय.

काय असते 'आयर्नमॅन' स्पर्धा?

अतिशय खडतर आणि अवघड ही स्पर्धा असते. १७ तासांमध्ये ती पूर्ण करायची असते. यात ३.९ किलोमीटर समुद्रात पोहणे, १८० किलोमीटर सायकलिंग आणि ४२ किलोमीटर धावणे या तीन स्पर्धांचा असतो. सातपूर औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत कार्यरत असलेले ३४ वर्षीय किशोर घुमरे यांनी १५ तास ११ मिनिटे २२ सेकंद, उद्योजक ५६ वर्षीय प्रशांत डबरी यांनी १६ तास २० मिनिटे ३३ सेकंद, उद्योजक ४३ वर्षीय महेंद्र छोरिया यांनी १६ तास २० मिनिटे ४१ सेकंद, तर बालरोगतज्ज्ञ ४० वर्षीय डॉ. अरुण गचाले यांनी १६ तास ५६ मिनिटे ९ सेकंदात ही स्पर्धा पूर्ण केलीय.

नाशिकच्या आठ जणांनी स्पर्धा केली पूर्ण 

यापूर्वी नाशिकला डॉ. रवींद्र सिंगल, अमर मियाजी, सुमेध व्हावळ, चेतन अग्निहोत्री यांच्या रूपाने चार आयर्नमॅन किताब मिळाले आहे. तर नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रॉलीयात किशोर घुमरे, प्रशांत डंबरी, महेंद्र छोरिया, अरुण गचाले यांना आयर्नमॅन किताब मिळाला आहे. असे आत्तापर्यंत एकूण आठ आयर्नमॅन नाशिक शहराला मिळाले आहे.

फिटनेसच्यादृष्टीने नाशिक शहर नेहमीच पुढे राहिले आहेत. त्यात गेल्या काही वर्षात अतिशय खडतर स्पर्धेत किताब मिळवण्यासाठी मोठी स्पर्धा सुरू झालीय. त्यात अनेकांना यशही मिळत आहे. त्यामुळे येत्या काळात भारतात नाशिकची आणखी एक नवी ओळख 'आयर्न सिटी' म्हणून नावारुपाला येईल, असा विश्वस या विजेत्यांकडून व्यक्त केला जातोय.