Maharashtra Political News : जयेश जगड, अकोला / बाळासाहेबांच्या शिवसेनेत (Balasahebanchi Shiv Sena ) अकोल्यात केवळ सहा महिन्यात दुफळी निर्माण झाली आहे. ( Political News In Marathi ) निधी वाटपाच्या मुद्द्यावरुन पदाधिकाऱ्यांनी संपर्कप्रमुख गोपिकीशन बाजोरिया यांची तक्रार थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे केली आहे. त्यामुळे शिंदे गटात सर्वकाही आलबेल नसल्याचे पुढे आले आहे. (Maharashtra Political News In Marathi )
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. त्यानंतर 40 आमदारांनी शिवसेनेशी फारकत घेत वेगळा गट स्थापन केला आणि भाजपसोबत हातमिळवणी केली. त्यानंतर राज्यात सरकार स्थापन केले. त्याचदरम्यान, शिंदे गटाने शिवसेना पक्षावर दावा केला. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगात गेले. मुंबईतील अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मोठा निर्णय देत निकाल येईलपर्यंत शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना आणि ठाकरे गटाला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हे नाव दिले. त्याचवेळी धनुष्यबाण चिन्हं गोठवून दोन स्वतंत्र चिन्हं दिलीत.
अकोल्यात शिंदे गटाच्या सहा महिन्यांच्या संसाराला कुणाची नजर लागली ? असा सवाल राजकीय वर्तुळातून विचारण्यात येत आहे. कारण शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी माजी आमदार तथा उपनेते गोपिकीशन बाजोरिया यांच्यावर कमिशन एजंटचा आरोप केलाय. हा आरोप करताना मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेल्या पत्राद्वारे केला आहे. बाजोरिया हे कार्यकर्त्यांना दुय्यम वागणूक देत असल्याचा आरोप या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. तर पक्षाने दिलेला निधी बाजोरिया आपल्या खासगी कामांसाठी करत पदाधिकाऱ्यांना दिलेल्या निधीमधून कमिशन मागत असल्याचा आरोपही जिल्हाध्यक्ष अश्विन नवले यांनी केला आहे. मात्र हा घरातला वाद असून पक्षश्रेष्ठी यावर निर्णय घेतील असेही अश्विन नवले यांनी म्हटले आहे.
मात्र पदाधिकाऱ्यांनी लावलेले हे आरोप बाजोरिया यांनी फेटाळले आहे.15 कोटी रुपयांचा हा निधी पक्षाने दिलेला नसून 2017 मध्ये आमदार असताना मंजूर झालेला निधी असल्याचं बाजोरिया म्हणाले. तर आपण हा निधी योग्य पद्धतीने वितरित केला असून सर्वाधिक प्रत्येकी तीन कोटी रुपयांची कामे अश्विन नवले, शशिकांत चोपडे यांना देण्यात आली असल्याचही ते म्हणाले.
राज्यात पक्ष अधिक बळकट होत असल्याने अनेकांचे दुखणे बाहेर येत असून पक्ष वाढू न देण्यासाठी मतभेद निर्माण करण्याचे काम केले जात असल्याचा आरोपही यावेळी बाजोरिया यांनी केला आहे. पक्षात प्रत्येकाला समसमान न्याय देण्याचे काम आपण करीत असून घरातील वाद हे आपसात न मिटविता पुढे आणले गेले आहेत. कोणतीही चूक नसताना निधीवरून आरोप केलेल्यांची मनधरणी अजिबात करणार नसून, मुंबईत होणाऱ्या बैठकीत सर्व बाबी स्पष्ट करु, असे माजी गोपीकिशन बाजोरिया यांनी प्रति आव्हान दिले आहे.
सध्याच्या निधी वितरणावरुन आरोप करणाऱ्यांचा संभ्रम झाला असेल किंवा ते भरकटले असतील, अशीही शक्यता त्यांनी वर्तविली आहे. गंभीर स्वरूपाच्या आरोप प्रत्यारोप नंतर शिंदे गटातील या दोन्ही तलवारी एका म्यानमध्ये राहितील का ? असा सवाल जिल्ह्यातून विचारण्यात येत आहे.