Maharashtra Rain : पुढील 3 ते 4 तास सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरसाठी महत्त्वाचे

 पावसाने धुमाकुळ घातला आहे. (Heavy rains in Maharashtra ) कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आभाळ फाटल्याप्रमाणे पाऊस धो धो कोसळत आहेत.  

Updated: Jul 23, 2021, 12:06 PM IST
 Maharashtra Rain : पुढील 3 ते 4 तास सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरसाठी महत्त्वाचे title=
संग्रहित छाया

मुंबई : राज्यात पावसाने धुमाकुळ घातला आहे. (Heavy rains in Maharashtra ) कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आभाळ फाटल्याप्रमाणे पाऊस धो धो कोसळत आहेत. त्यामुळे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर, सांगली, सातारा येथे पूरस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, पुढील तीन ते चार तास सिंधुदुर्ग (Sindhudurg) आणि कोल्हापूरसाठी (  Kolhapur) महत्त्वाचे आहेत. कारण दोन्ही जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता, भारतीय हवामान विभागाने वर्तविली असून तसा इशारा दिला आहे. (Intense to very intense spells of rain very likely to Sindhudurg, Kolhapur during Next 3 hours)

कोल्हापुरात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. रात्रीच्या विश्रांतीनंतर पावसाचा जोरदार सरी कोसळत आहेत.  कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्याला पुढचे 3 तास महत्त्वाचे असून मुसळधार पाऊस कोसळण्याचा इशारा देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्हयात ढगफुटीप्रमाणे पाऊस झाला आहे. (Heavy rains in Sindhudurg, Maharashtra ) सह्याद्रीच्या खोऱ्यात ढगफुटी झाल्याने कर्ली आणि तेरेखोल नदीला पूर आला आहे. नदीकाटची अनेक गाव पाण्याखाली गेली आहेत. माडखोल, सावंतवाडी आंबोली मार्गावर तीन ते चार फूट पाणी आले आहे. दोडामार्ग तिलारी नदीने देखील धोक्याची पातळी ओलांडली अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत. कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने तेरेखोल नदीला पूर आला. पुराचे पाणी बाजारपेठेत घुसल्याने व्यापारी धास्तावले आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीने धोका पातळी ओलांडली आहे. त्यामुळे कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील अनेक सखल भागात पुराचे पाणी घुसू लागले आहे. पंचगंगा नदीची धोका पातळी 43 फूट असून सध्या पंचगंगा नदीची पाणीपातळी 46 फूट 1 इंच इतकी आहे. पंचगंगा नदीने अवघ्या तीन दिवसात पडलेल्या मुसळधार पावसानंतर धोका पातळी ओलांडल्याने अनेक भागाचा संपर्क तुटला आहे. जिल्ह्यातही पावसाचा जोर मोठ्या प्रमाणावर आहे. मुसळधार पावसाने गगनबावडा मार्गावर पुराचं पाणी आल्याने वाहतुकीसाठीचा रस्ता बंद करण्यात आला आहे. तर कासारी नदीच पाणी रस्तावर आल्याने गावाचा संपर्क तुटला. जिल्ह्यातील तब्बल 39 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.