दुष्काळामुळे राज्यातील विमा कंपन्यांचा फायदा; राजू शेट्टींचा आरोप

 खोटे रेकॉर्ड तयार करून शेतकऱ्यांना पीकविम्यापासून वंचित ठेवण्यात आले.

Updated: Jun 14, 2019, 11:24 AM IST
दुष्काळामुळे राज्यातील विमा कंपन्यांचा फायदा; राजू शेट्टींचा आरोप title=

नाशिक: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे पीक विमा कंपन्या मालामाल झाल्या आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या हातात काहीच पडले नाही, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली. त्यांनी बुधवारी नांदगाव तालुक्यातील चांदोरा येथील चारा छावण्यांना भेट दिली. यावेळी त्यांनी राज्य सरकार आणि विमा कंपन्या दुष्काळी परिस्थितीचा फायदा करून घेत असल्याचा आरोप केला.

गेल्या दोन वर्षांपासून दुष्काळ असताना विमा कंपन्यांनी २० हजार कोटी रुपये नफा कमावला आहे. खोटे रेकॉर्ड तयार करून शेतकऱ्यांना पीकविम्यापासून वंचित ठेवण्यात आले. वास्तविक दुष्काळ असल्याने या कंपन्या बुडायला हव्या होत्या. पण त्यांना नफा झाला. कारण कोणत्याही शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळाला नाही. त्यासाठी सरकार व सरकारी यंत्रणेला विमा कंपन्यांनी या लुटीत सहभागी करून घेतले. कारण या कंपन्या बड्या उद्योगपतींच्या आहेत, अशी टीका राजू शेट्टी यांनी केली.

जालन्यात दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या नातेसंबंधात दुरावा

सरकारने दुष्काळासाठी उपाययोजना जाहीर केल्या असल्या तरी त्या केवळ कागदावरच मर्यादित राहिल्या आहेत. पीक विमा योजना ही शेतकऱ्यांना नव्हे तर कॉर्पोरेट विमा कंपन्यांना जगविण्यासाठी सुरु आहे. सरकारकडे समृद्धी महामार्गावर खर्च करण्यासाठी पैसा आहे पण शेतकऱ्यांना देण्यासाठी नाही, असेही त्यांनी सांगितले.

'राजेशाही असती तर दुष्काळ निवारणाचे निर्णय घेऊन कधीच रिकामा झाला असतो'

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे राज्यात दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करायला उशीर झाला होता. यानंतर केंद्राकडून राज्याला दुष्काळ निवारणासाठी २ हजार १६० कोटींची मदत जाहीर करण्यात आली होती. राज्य सरकारने यापूर्वीच १५१ तालुक्यात दुष्काळ जाहीर केला होता.