महापुरुषांची पुण्यतिथी विसरलेल्या कॅलेंडरचे आदेश आघाडी सरकारच्या काळातले

दिनदर्शिकेतून पुण्यतिथी वगळण्याचे आदेश २०१३चे म्हणजेच आघाडी सरकारच्या काळातले 

Updated: Jan 6, 2019, 07:27 AM IST
महापुरुषांची पुण्यतिथी विसरलेल्या कॅलेंडरचे आदेश आघाडी सरकारच्या काळातले   title=

मुंबई : राज्य सरकारच्या दिनदर्शिकेत महापुरुषांच्या पुण्यतिथींचा उल्लेख नसल्याचा विरोधकांचा कांगावा त्यांच्यावरच उलटल्याचे दिसून येतेय. सरकार जाणीवपूर्वक महापुरुषांचा अपमान करत असल्याचा आरोप विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला होता. विरोधकांनी सरकारला याप्रश्नी चांगलेच धारेवर धरले. त्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेतल चौकशी करण्यात आली. यामध्ये वेगळेच सत्य बाहेर आले आहे. दिनदर्शिकेतून पुण्यतिथी वगळण्याचे आदेश २०१३चे म्हणजेच आघाडी सरकारच्या काळातले असल्याचे स्पष्टीकरण माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाने दिले आहेत.

 २०१३ मध्ये शासकीय स्तरावरुन फक्त जयंतीच साजरी करावी असा निर्णय झाल्याने आणि तसा जयंती कार्यक्रमांचा शासन निर्णय निर्गमित होत असल्याने त्यांचाच उल्लेख यावर्षीच्या दिनदर्शिकेत करण्यात आलाय. दरवर्षीच्या शासकीय दिनदर्शिकेमध्ये ज्याप्रमाणे पुण्यतिथींचा उल्लेख करण्यात येत नाही, तीच पद्धत यावर्षी देखील अनुसरण्यात आल्याचंही प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगण्यात आलंय. 

विरोधकांचे आरोप 

फडणवीस सरकारला महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीचा विसर पडल्याची टीका फडणवीस सरकारवर करण्यात आली.  राज्य सरकारच्या नववर्ष दिनदर्शिकेत डॉ. आंबेडकर यांच्या ६ डिसेंबरचा महापरिनिर्वाण दिन आणि २८ नोव्हेंबरच्या महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीचा उल्लेख नसल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून नुकतीच नवीन वर्षाची दिनदर्शिका प्रकाशित करत सर्व सरकारी कार्यालयांमध्ये या दिनदर्शिकेचे वितरण करण्यात आले. यामध्ये १ डिसेंबरला जागतिक एडस प्रतिबंधक दिन, २ डिसेंबरला राष्ट्रीय प्रदूषण प्रतिबंध दिन आणि ३ डिसेंबरला जागतिक अपंग दिनाचा उल्लेख असल्याचेही विरोधकांनी सांगितले.