बीड : हभप इंदुरीकर महाराज हे आपल्या कीर्तनाच्या शैलीमुळे लोकप्रिय आहेत. इंदुरीकर महाराज हे राजकीय नेत्यांवर भाष्य करत नाहीत, पण त्यांनी महाराष्ट्रातील एका राजकीय नेत्यावर भाष्य केलं आहे. इंदुरीकर महाराज ज्या कार्यक्रमात जातात, त्या कार्यक्रमाच्या आयोजकांविषयी खूप सकारात्मक बोलतात, असं यावरून दिसून येतंय. नेहमी खरमरीत आणि फटकळ बोलणारे, इंदुरीकर सर्वच लोकांना भावतात असं नाही. इंदुरीकर 'खरं'मरीत बोलत असल्याने, इंदुरीकर असं कसं बोलतात असं म्हणणारा देखील वर्ग आहे. (कीर्तनाचा व्हिडीओ पाहा सर्वात खाली)
हभप इंदुरीकर आवडणारा आणि नावडणारा देखील वर्ग आहे. पण इंदुरीकरांच्या कीर्तनाला दुर्लक्षित करणारा वर्ग नाही. इंदुरीकरांनी यूट्यूबवर प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. गाव खेड्यात एकटाच मोबाईलवर इंदुरीकर ऐकत, गालातल्या गालात हसणारा गडी तुम्हाला पाहायला मिळेल. इंदुरीकर यांच्या कीर्तनातील मिश्किल उदाहरणं देखील गावोगावी दररोजच्या व्यवहारातून दिले जातात.
इंदुरीकर टेलव्हिजनपेक्षा मोबाईलवर जास्त लोकप्रिय आहेत. पण आता इंदुरीकरांनी जाहीर कीर्तनात राजकीय नेत्यांचं कौतुक करण्यास सुरूवात केली आहे. कौतुक ठिक आहे, पण ज्या नेत्याचं कौतुक केलं त्यांच्या विरोधकांनी त्याला आक्षेप घेऊ नये, एवढंच.
पण बोलण्यात धुरंधर असणारे इंदुरीकर अडचणीत येणं, तसं फार कठीणंही आहे. कारण इंदुरीकरांच्या फटकळ आणि खरमरीत शैलीला डोक्यावर घेणारा वर्गही तेवढा मोठा आहे.
इंदुरीकरांनी आपल्या जाहीर कीर्तनात सांगितलं, धनंजय मुंडे यांच्यावर मी जास्त प्रेम करतो, कारण त्यांच्या जिभेवर सरस्वती आहे. कारण त्यांच्या जिभेवर सरस्वती आहे. जिभेवर चांगले शब्द येणं ही सरस्वती आहे, असं हभप इंदुरीकर महाराज यांनी कीर्तनात सांगितलं.
इंदुरीकरांनी, 'देवा पांडुरंगा गणपती बाप्पा, शेतकरी सुखी राहू दे, हिंदू धर्मांचं दैवत गाय टिकू दे, हिंदू धर्म वाचू दे, वाढू दे', असं इंदुरीकरांनी म्हणत कीर्तनाला सुरूवात केली.