मुंबई : महिलांबाबतच्या विधानामुळे वादात सापडलेल्या इंदुरीकर महाराजांना दिलासा मिळाला आहे. इंदुरीकर महाराजांच्या व्हिडीओची तपासणी सायबर सेलकडे देण्यात आली. किर्तनाचा 'तो' व्हिडीओ यु्ट्यूबवर उपलब्ध नसल्याचे सायबर सेलतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
तो व्हिडीओ युट्यूबवर नसल्याचा खुलासा सायबर सेलने केला आहे. या व्हिडीओची तथ्यता जाणून घेण्यासाठी सायबर सेलकडे हे प्रकरण होते. सक्षम पुरावे नसल्याने दुसरी नोटीस पाठवण्याची शक्यता नसल्याचेही सांगण्यात येत आहे.
हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी सम-विषम वादावर दिलगिरी व्यक्त केली. कुणाच्याही भावना दुखावण्याचा आपला उद्देश नव्हता, पण भावना दुखावल्या असल्यास आपण मनापासून दिलगिरी व्यक्त करतो, असं इंदुरीकर महाराज यांनी एका पत्रकाद्वारे स्पष्टीकरण देत, दिलगिरी व्यक्त केली आहे.
सम तारखेला संभोग केल्यास पुत्र होतो, तर विषम तारखेला केल्यास कन्या होते, असं विधान त्यांनी आपल्या कीर्तनादरम्यान केलं होतं, यावर इंदुरीकर महाराज यांच्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती, तर काहींनी थेट कायदेशीर तक्रार दाखल करत, इंदुरीकर महाराज अंधश्रद्धा पसरवत असल्याचा आरोप केला होता.
या दरम्यान इंदुरीकर महाराज यांनी सावध पवित्रा घेत वादावर काहीही बोलणार नसल्याचं सांगत मौन पाळलं होतं, तर इंदुरीकर यांच्या चाहत्यावर्गाने इंदुरीकर यांचं मोठ्या प्रमाणात समर्थन देखील केलं आहे, तरी देखील इंदुरीकर महाराज यांनी आपण दिलगिरी व्यक्त करत असल्याचं सांगितलं.
इंदुरीकर यांनी या वादानंतर आता खूप झालं, आता फेटा ठेवून देणार, कीर्तन सोडून शेती करणार असं देखील म्हटलं होतं, पण त्यांच्या चाहत्यांनी महाराज कीर्तन सोडू नका अशी विनंती देखील त्यांना केली होती.