मुंबई : मी लस घेतली नाही आणि घेणार नाही. तुमच मन खंबीर असल तर कोरोना होणार नाही असं सांगत इंदुरीकर महाराजांनी पुन्हा एकदा आपल्या कीर्तनामध्ये वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. इंदुरीकर महाराजांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा राज्यभर होत आहे. एकाबाजूला मुख्यमंत्री राज्यात पूर्ण लसीकरण व्हावं यावर भर देत आहेत. तेथे इंदुरीकर महाराजांच हे वक्तव्य विरोधाभास निर्माण करणार आहे.
काँग्रेसच्या एका कार्यक्रमामध्ये इगतपुरी सारख्या आदिवासी तालुक्यात सुरुवातीपासून लसीकरण उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्वात अधिक अडचणी येत आहेत. अनेक लोक दारू प्यायल्याने कोरोना होत नाही अशा गैरसमजापोटी व्यसनाधीन झाले आहेत. एका बाजूला शंभर टक्के लसीकरण करण्यासाठी सरकार युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असताना अशी वक्तव्य नागरिकांचा संभ्रम निर्माण करत आहेत. इंदुरीकर महाराजांनी आरोग्याचे विपरीत सल्ले देण्यास सुरुवात केली आहे.
नाशिक जिल्ह्यातील घोटी येथे कृपी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी मेळावा आणि इंदुरीकर महाराजांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला ५०० हून अधिक जणांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात बोलताना इंदुरीकर महाराज यांनी करोना परिस्थिती व लसीबाबत खळबळ उडवून देणारे वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळं ते पुन्हा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
ज्याची त्याची प्रतिकार शक्ती वेगळी आहे हे कळायला नको का. प्रत्येकाच्या मेंदूची क्षमता देखील वेगळी आहे. मी सगळीकडे फिरतो. मी तर लस घेतली नाही आणि घेणारही नाही. काही होतंच नाही तर घेऊन करायचे काय? करोनाला एकच औषध आहे मन खंबीर ठेवा. १४ वर्ष राम वनवासात गेले होते तर सीतेला सोबत घेऊन गेले होते. इथे राम १४ दिवस क्वारंटाईन झाला तर सीतेने डोकावून पाहिला नाही, अस वक्तव्य इंदुरीकर महाराज यांनी केलं आहे.