Vande Bharat train on Konkan Railway : कोकण रेल्वेवर वंदे भारत एक्स्प्रेस धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 27 जूनपासून ही गाडी धावणार आहे. दरम्यान, ओडिशातल्या बालासोरमध्ये (Odisha Train Accident) शुक्रवारी 3 जून रोजी रात्री मोठा रेल्वे अपघात झाला. त्यामुळे मडगाव-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचा उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आला होता. आता 27 जूनला हिरवा कंदील दाखविण्यात येणार आहे.
कोकणवासीय ज्या बहुप्रतिक्षित रेल्वेची वाट पाहत होते ती आता संपली आहे. गणपतीसाठी जाण्यासाठी ही गाडी महत्त्वाची ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 जून रोजी एकाच वेळी पाच वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा कंदील दाखवतील. रेल्वे मंत्रालयाकडून दिलेल्या माहितीनुसार, मडगाव (गोवा) - मुंबई, पाटणा-रांची, भोपाळ-इंदूर, भोपाळ-जबलपूर आणि बेंगळुरु-हुबळी-धारवाड या पाच गाड्या सोडण्यात येणार आहेत. या नवीन गाड्या सुरु झाल्यानंतर देशातील रेल्वे नेटवर्कवर धावणाऱ्या वंदे भारत गाड्यांची एकूण संख्या 23 होईल.
कोकण रेल्वे मार्गावर वंदे भारत धावणार असल्याने प्रवाशांना अधिक सोयीसुविधा उपलब्ध होतील. आरामदायी प्रवास करता येणार आहे. कोकण मार्गावरील बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षेत असलेली मुंबई-गोवा वंदे भारत 5 जून रोजी धावणार होती. मात्र 3 जून रोजी बालासोर येथे रेल्वे अपघात झाल्याने उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. आता 27 जून रोजी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच वंदे भारत गाडय़ांना हिरवा झेंडा दाखविणार आहेत. 10 जूनपासून कोकण रेल्वे मार्गावर पावसाळी वेळापत्रक लागू झाल्याने रेल्वे गाडयांचा वेग कमी झाला आहे. त्यामुळे वंदे भारतच्या वेगावरही मर्यादा येणार आहे.
वंदे भारत ट्रेन आठवड्यातून 6 दिवस धावणार आहे. शुक्रवारी ही गाडी धावणार नाही. मुंबईहून गोव्याला जायचे असल्यास ही ट्रेन पहाटे 5.25 वाजता सुटेल. दुपारी 1.15 वाजता गोव्यात पोहोचेल. ही ट्रेन गोव्यापासून दुपारी 2.35 वाजता सुटेल आणि रात्री 10.25 वाजता पोहोचेल. दादर, ठाणे, पनवेल, खेड, रत्नागिरी, कणकवली या स्थानकांवरही ती थांबेल.
18 वंदे भारत गाड्या वेगवेगळ्या मार्गांवर धावत आहेत. याशिवाय लवकरच आणखी तीन वंदे भारत गाड्या रेल्वेकडून सुरु करण्यात येत आहेत. अशाप्रकारे जूनअखेर देशात एकूण 23 गाड्या सुरु होतील. मध्य प्रदेश व्यतिरिक्त मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसलाही 27 जून रोजी हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. कर्नाटकातही सेमी हायस्पीड गाड्या चालवल्या जाणार आहेत. पाटणा आणि रांचीला जोडणारी ट्रेन म्हणून बिहारला पहिली वंदे भारत ट्रेन मिळणार आहे. या ट्रेनला गया, कोडरमा, हजारीबाग रोड, पारसनाथ आणि बोकारो स्टील सिटी येथे थांबा मिळणे अपेक्षित आहे. ही ट्रेन सुमारे 410 किमी अंतर कापणार आहे.