Goa Trains : चिंताच मिटली; वीकेंडला सहज गोवा गाठता येणार, कोणत्या ट्रेन तुमच्यासाठी फायदेशीर?

Konkan Railway : मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत गोव्याला जायचा प्लॅन बनतोय? तिकीटाची चिंता आता करूच नका. तुमच्या सेवेत येतेय वीकेंड स्पेशल ट्रेन   

सायली पाटील | Updated: Aug 14, 2024, 09:42 AM IST
Goa Trains : चिंताच मिटली; वीकेंडला सहज गोवा गाठता येणार, कोणत्या ट्रेन तुमच्यासाठी फायदेशीर?  title=
Indian Railways Konakn railway to run weekend special trains to goa

Indian Railway : कोकण रेल्वे, (Konkan Railway) तिकीट आरक्षण आणि त्या अवतीभोवती फिरणाऱ्या अनेक गोष्टींचीच सध्या चर्चा सुरु आहे. कारण आणि निमित्त आहे ते म्हणजे गणेशोत्सवाचं. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाला जाण्यासाठी अनेकांचीच लगबग सुरू असून, आरक्षित तिकीटासाठी धडपडही सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. इथं मध्य रेल्वेच्या साथीनं कोकण रेल्वे प्रवाशांना गर्दीच्या या दिवसांमध्ये विशेष गाड्या पुरवण्यापर्यंतची सुविधा देत असतानाच आणखी एका कमाल सुविधेची भर यामध्ये पडली आहे. 

गणेशोत्सवाची (Ganeshotsav 2024) लगबग असतानाच आठवडी सुट्ट्यांना धरून जोडूनच आलेल्या सुट्ट्यांमुळे सध्या बऱ्याचजणांचे पाय पर्यटनस्थळांकडे वळत आहेत. त्यातही अनेक मंडळी थेट राज्याची सीमा ओलांडून शेजारी असणाऱ्या गोव्याच्या दिशेनं निघण्याचे बेत आखताना दिसत आहेत. परिणामी गोव्याहून जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्यांमध्ये तुडूंब गर्दी होणं अपेक्षित असून, प्रवाशांच्या गरजा लक्षात घेत आता रेल्वेनं प्रवाशांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 

हेसुद्धा वाचा : स्वतंत्र भारतातील हा रेल्वेमार्ग आजही ब्रिटीशांचा 'गुलाम'? भरावा लागत होता कोट्यवधींचा लगान

 

15 ते 17 ऑगस्टच्या मोठ्या वीकेंडसाठी कोकण रेल्वेनं विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. याच निर्णयाच्या धर्तीवर लोकमान्य टिळक टर्मिनल- मडगाव जंक्शन 01149 ही रेल्वे चालवली जाणार असून, एलटीटीहून ही गाडी रात्री 9 वाजता अपेक्षित स्थानकाच्या रोखानं प्रवास सुरू करेल. तर, दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता ही रेल्वे 10 वाजता मडगाव जंक्शन येथे पोहोचेल. 16 ते 18 ऑगस्टदरम्यान मडगाव जंक्शन ते एलटीटी 01150 ही लोकल सकाळी 11 वाजता प्रवास सुरू करून दुसऱ्या दिवशी रात्री 12.40 मिनिटांनी मुंबईतील एलटीटी इथं पोहोचेल.  

कुठे कुठे थांबणार विशेष रेल्वे? 

ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम आणि कमाळी या स्थानकांवर थांबेल. त्यामुळं गोव्याचा प्लॅन बनत असेल किंवा असा विचारही डोक्यात असेल तर ही रेल्वे तुमच्या या विचाराला नक्कीच मदत करेल असं म्हणायला हरकत नाही.