गोकुळ दुग्ध संघावर आयकर खात्याचा छापा; सहकार क्षेत्रात खळबळ

गोकुळ दूध संघाची सुमारे दोन हजार कोटींची वार्षिक उलाढाल आहे.

Updated: Mar 6, 2019, 07:44 AM IST
गोकुळ दुग्ध संघावर आयकर खात्याचा छापा; सहकार क्षेत्रात खळबळ title=

कोल्हापूर: गोकुळ दूध महासंघाच्या कोल्हापूरातील कार्यालयावर मंगळवारी संध्याकाळी आयकर खात्याकडून छापा टाकण्यात आला. यामुळे कोल्हापूर आणि राज्यातील सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, आर्थिक गैरव्यवहाराच्या संशयामुळे ही छापेमारी करण्यात आल्याचे समजते. काल संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आयकर खात्याचे अधिकारी शिरगाव येथील गोकुळच्या कार्यालयात दाखल झाले. यानंतर आयकर विभागाचे अधिकारी जवळपास पाच तास गोकुळच्या कार्यालायात तपास करत होते. यावेळी प्रामुख्याने आर्थिक व्यवहारांशी संबंधित कागदपत्रांची छाननी करण्यात आली. या वृत्ताला गोकुळ दुग्ध संघातील अनेक कर्मचाऱ्यांनी दुजोरा दिला असला तरी संस्थेकडून यासंदर्भात कोणतेही अधिकृत भाष्य करण्यात आलेले नाही. मात्र, एकूणच या कारवाईमुळे राज्यातील सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. या कारवाईदरम्यान आयकर विभागाच्या हाती काही लागले का, याबद्दलही उलटसुलट चर्चा सुरु आहेत.

गोकुळ दूध संघाची सुमारे दोन हजार कोटींची वार्षिक उलाढाल आहे. दूध संघाकडून दर महिन्याला आयकरही भरला जातो. तथापि, चालू आर्थिक वर्षात आयकरची रक्कम कमी भरल्याचे निदर्शनास आल्याने ही कारवाई केल्याचे आयकर विभागाचे म्हणणे आहे. 

राज्यातील सहकार क्षेत्रावर आतापर्यंत नेहमीच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचे वर्चस्व राहिले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये भाजपने पद्धतशीरपणे या क्षेत्रात हातपाय पसरायला सुरुवात केली होती. मात्र, या सगळ्याला म्हणावे तितके यश आलेले नाही. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर सरकारकडून तपासयंत्रणांकरवी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून होऊ शकतो. त्यामुळे आता हे प्रकरण कुठपर्यंत जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.