तुषार तपासे, झी मीडिया, सातारा : दीड वर्षांपूर्वी मंजूर झालेले अंतर्गत रस्त्याचे काम पूर्ण न केल्याने वाई पंचायत समिती सदस्य दीपक ननावरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
वाई पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील अधिकारी कामे न करता फक्त खुर्चीवर बसून राहतात. त्यामुळे त्यांना त्या खुर्चीवर बसण्याचा नैतिक अधिकार नाही असे म्हणत ननावरे आणि ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांची खुर्ची काढून घेतली.
दीपक ननावरे यांनी केवळ त्या अधिकार्यांची खुर्ची काढून घेत नाही तर ती चारचाकी गाडीत घालून पळवून नेली. रस्त्याची कामे पूर्ण झाल्याशिवाय खुर्ची परत करणार नाही असा त्यांनी पवित्रा घेतला.
तसेच, वेळेत काम पूर्ण न झाल्यास त्यांचे टेबलही काढून घेऊ असा इशाराही ननावरे यांनी दिला. या प्रकाराने वाई पंचायत समितीमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.