दहावीत सर्वच विषयात ३५ गुण घेऊन पास होण्याचा पराक्रम

उस्मानाबादच्या रोहितला दहावीच्या परीक्षेत सर्वच विषयात ३५ गुण

Updated: Jun 9, 2019, 05:54 PM IST
दहावीत सर्वच विषयात ३५ गुण घेऊन पास होण्याचा पराक्रम title=

मुस्तान मिर्झा, झी मीडिया, उस्मानाबाद : एकीकडे दहावीत राज्यातील १०० पैकी १०० टक्के घेणाऱ्या २० विद्यार्थ्यांपैकी २ विद्यार्थी उस्मानाबाद जिल्ह्यातील आहेत. तर दुसरीकडे याच जिल्ह्यातील अपसिंगा या गावच्या विद्यार्थ्याने सर्वच विषयात ३५ गुण घेऊन पास होण्याचा पराक्रम केला आहे. रोहित रोहिदास सोनवणे असे या विद्यार्थ्याचे नाव आहे़. त्याने तुळजापूर तालुक्यातील आपसिंगा येथील नरेंद्र आर्य विद्यालयातून दहावीची परिक्षा दिली होती. 

शनिवारी दहावीचा निकाल जाहीर झाला. या निकालात रोहितला मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान आणि सामाजिकशास्त्र अशा सर्वच विषयात प्रत्येकी ३५ गुण मिळाले आहेत. त्याचा निकाल राज्यभरात सोशल मीडियावर फिरत असून जिल्ह्यातही त्याचीच चर्चा सुरू आहे. गावातील मुलाने अशी आगळी वेगळी कामगिरी केल्याने गावातील लोकांनी त्याचा सत्कारदेखील केला आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील आपसिंगा गावातील रोहितचे वडील रोहिदास सोनवणे व त्यांच्या पत्नी शेती करून कुटुंबाची उपजीविका भागवितात. रोहितचा एक भाऊ आठवीत तर बहीण सहावीचे शिक्षण घेत आहे़. रोहितचे आई-वडील हे दहावीपर्यंतही शिक्षण घेऊ शकले नाही. त्यामुळे मुलांच्या शिक्षणाप्रती ते जागरुक आहेत. असे असले तरी घरची परिस्थिती प्रतिकूल असल्याने व भावंडातील सर्वात मोठा असल्याने रोहित हा आई-वडिलांना शेती कामात मदत करतो.

आता लक्ष्य बारावी - रोहित सोनवणे

दहावीला कमी टक्केवारी पडली असली तरी याचा विचार मी करीत नाही. पुढे बारावीत जास्तीत-जास्त गुण संपादन करण्याचा मानस आहे. वडिलांना शेतीत मदत करीत जमेल व झेपेल तेवढा अभ्यास करून मी परीक्षा दिली होती. कमी टक्केवारी पडल्याचा विचार न करता नव्या उमेदीने पुढील शिक्षणाचा विचार करीत असल्याची प्रतिक्रिया रोहितने दिली आहे.