रायगड : रायगडमध्ये टाकाऊ प्लॅस्टिकपासून टिकाऊ रोड साकारण्यात आला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने रस्ते बांधणीच्या कामात प्लॅस्टिकचा वापर केला आहे. रायगडमधील नागोठणे येथील रिलायन्स इंडस्ट्रीज प्रकल्पात हा ४० किलोमिटर लांबीचा रस्ता तयार करण्यात आला आहे. यासाठी ५० टन टाकाऊ प्लॅस्टिक वापरण्यात आलंय. रस्ते बांधणीसाठी लागणाऱ्या साहित्यात ८ ते १० टक्के प्लॅस्टिकचा वापर करण्यात आलाय.
प्लॅस्टिकमुळे हे रस्ते अधिक मजबूत आणि टिकावू झाल्याचा दावा रिलायन्स इंडस्ट्रीजकडून करण्यात आला. हे रस्ते साधारण एप्रिल मे दरम्यान बनवण्यात आले. यंदा रायगड जिल्हयात जवळपास साडेपाच हजार मिलीमीटर इतका पाऊस झाला मात्र अवजड वाहनांची वाहतूक होऊनही हे रस्ते खराब झालेले नाहीत, असा दावा रिलायन्सनं केलाय. प्लॅस्टिकच्या वापरामुळे रस्ता बांधणीचा खर्चही प्रतिकिलोमीटर १ लाकांनी कमी झाल्याचं सांगण्यात आलंय.
दरम्यान, मुंबईतल्या रस्ते बांधणीत प्लॅस्टिकचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. १५ फेब्रुवारीपासून रस्ते बनवताना डांबरात प्लॅस्टिक मिसळणं बंधनकारक करण्यात आलं आहे. त्यामुळं यापुढील काळात मुंबईतले रस्ते प्लॅस्टिकचे बनतील असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.
यामुळे मुंबईत जमा होणाऱ्या प्लॅस्टिकची विल्हेवाट लागणार आहे. शिवाय पर्यावरणाला हातभार लागणार असल्याचंही महापौरांनी सांगितलंय.
मुंबईत दीड वर्षांपूर्वी प्लॅस्टिक बंदी करण्यात आली असून दुकाने, मार्केट तसेच शॉपिंग सेंटर आणि मॉल्समधील गाळेधारकांना प्लास्टिक पिशव्यांचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली. त्यामुळे आतापर्यंत हजारो किलो जप्त करण्यात आलेल्या प्लॅस्टिक पिशव्यांच्या साठ्याची विल्हेवाट लावण्याचे आव्हान महापालिकेपुढं आहे. तसंच प्लॅस्टिकवरील बंदीपूर्वी अनेक प्लॅस्टिक पिशव्या या कचर्यामध्ये जमा झालेल्या आहेत. ज्यामुळं पर्यावरणाची हानी होत असून या प्लॅस्टिक कचर्याचा वापर करून रस्ते बनवण्याची मागणी केली जात होती.