Pune Crime News : पुण्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. अंगावर राख पडल्याने झालेल्या वादातून एका तरुणाने वाद झालेल्या तरुणाच्या अंगावर पिटबूल कुत्रा सोडून त्याला जखमी केले आहे. या घटनेत 18 वर्षीय तरुण गंभीर झाला आहे. त्याच्या पार्श्वभागाला गंभीर दुखापत झाली आहे. हा वाद पोलिस ठाण्यात गेला असून अंगावर कुत्रा सोडणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राख अंगावर पडल्याने तरुणावर पिटबूल कुत्रा सोडल्या प्रकरणी आंदेकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेकोटी करीत असताना अंगावर राख पडल्याच्या कारणावरून एका तरुणाने दुसऱ्याच्या अंगावर पिटबुल जातीचे कुत्रे सोडून त्याला चावा घेण्यास सांगितले. या कुत्र्याने संबंधित तरुणाच्या हाताला आणि पार्श्वभागाला चावा घेऊन त्याला गंभीर जखमी केल्याची घटना पर्वती येथील लक्ष्मी नगर मधील शाहू वसाहतीमध्ये घडली. याप्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यामध्ये संबंधित तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आदित्य नितीन आंदेकर (वय 25 वर्षे) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. आदित्य हा सर्वे नंबर 92, शाहू वसाहत, लक्ष्मी नगर, पर्वती येथे राहणारा आहे. याप्रकरणी तन्वीर रमजान सय्यद (वय 18 वर्षे) याने आदित्य विरोधात तक्रार दाखल केली. तन्वीर हा लक्ष्मी नगर, पर्वती येथे राहतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तन्वीर सय्यद या घटनेत गंभीर जखमी झाला आहे. पर्वती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तन्वीर आणि त्यांचे मित्र घराजवळच शेकोटी करत बसलेले होते. त्या ठिकाणी असलेल्या भिंतीवर राखेची टोपली ठेवण्यात आलेली होती. ही राखीची टोपली आरोपी आदित्य आंदेकरच्या अंगावर पडली. त्यामुळे चिडलेल्या आदित्य याने याबाबत विचारणा करण्यास सुरुवात केली. ही टोपली तन्वीर यानेच टाकली असा समज त्याने करून घेतला. त्याने तन्वीरला शिवीगाळ करून गचांडी पकडत हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याचे पिटबुल जातीचे कुत्रे सोबत होते. या कुत्र्याला ‘सारा धर याला’ असे म्हणत त्याच्या अंगावर सोडले. या कुत्र्याने फिर्यादीच्या हाताला आणि पार्श्वभागाला चावा घेत त्यांना गंभीर जखमी केले. त्यानंतर आरोपीने ‘पोलीस चौकीमध्ये तक्रार देतोस काय?’ असे म्हणत बघून घेण्याची धमकी देऊन दमदाटी केली आहे. तन्वीर याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, पोलिसांनी तन्वीर याच्या तक्रारीनुसार आदित्यवर गुन्हा दाखल केला आहे.