द्राक्ष बागांना अवकाळी पावसाचा फटका; वाइन उत्पादन घटलं

वाइन सीजनवर मंदीचं सावट...

Updated: Jan 16, 2020, 09:28 PM IST
द्राक्ष बागांना अवकाळी पावसाचा फटका;  वाइन उत्पादन घटलं title=
संग्रहित फोटो

योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : नैसर्गिक आपत्तीचा फटका वाईन, द्राक्ष बागांना बसतो आहे. नाशिक जिल्ह्यात यावर्षी ३० टक्के वाइन उत्पादन घटतंय. त्यामुळे यावेळी वाईन सीजन काहीसा मंदीचा राहणार आहे. जानेवारी महिना म्हटलं की नाशिकमध्ये वाईन क्रशिंगची धूम सुरू होते. डिसेंबर ते एप्रिलमध्ये वाईन स्टम्पिंग करण्यासाठी देशभरातून लोक नाशिकमध्ये येतात . त्यांच्यासाठी वाईन फेस्टचं आयोजनही केलं जातं. मात्र यंदा या वाईन उद्योगावर मंदीचं सावट आहे. 

आर्थिक मंदीमुळे  जागतिक वाईन उद्योगासोबत नाशिक जिल्ह्यातील वाईनचा खप गेल्यावर्षी  २५ टक्के कमी झाला. वायनरीमध्ये २५ टक्के वाईन पडून आहे. ती सांभाळण्याचा खर्चही सर्वाधिक आहे. आता टँकमधील वाईन खपवण्यासाठी वाईन उत्पादक विविध सवलतींचा मारा करताना दिसतायत. तसंच नवीन वाईन तयार करण्याबाबतही प्रश्न पडल्याचं वाईन उत्पादकांचं म्हणणं आहे.

अवकाळी पाऊस, अतिवृष्टी आणि आता धुकं दाटल्यानेही द्राक्षाचं उत्पादन २५ ते ३० टक्के घटतंय.

उत्पादन कमी होणार असलं तरी वाईन प्रेमींसाठी मात्र गेल्या वर्षीची वाईन शिल्लक असल्याने, जुन्या वाईनची चव चाखायला मिळणार आहे. मात्र द्राक्ष शेतकऱ्याला याचा फटका बसणार आहे.