Rain Updates : गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रासह देशातील बऱ्याच भागांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळालं होतं. ज्यानंतर बऱ्याच भागांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. सध्या सुरु असणाऱ्या हत्ती नक्षत्राच्या पार्श्वभूमीवर पाऊस सुरु झाला असतानाच हवामान खात्यानंही मुंबईसह राज्यात पुढचे 4 दिवस पावसाचा इशारा दिला. (IMD preditcs heavy rain for next 4 days in konkan mumbai)
मुंबईसह (Mumbai) बहुतांश जिल्ह्यात पुढील चार दिवसांसाठी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. तर, हवामानातील बदलामुळे परतीचा पाऊस अजून महाराष्ट्रात दाखल झालेला नाही. सध्या परतीचा पाऊस गुजरात, मध्य आणि उत्तरप्रदेशमध्ये आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून, शेतीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
शेतमालाला फटका
अमरावतीत (Amravati) परतीच्या पावसाने संत्री बागांचं मोठं नुकसान झालं आहे. अचलपूर, चांदूर बाजार, तिवसा, धामणगाव रेल्वे, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, या तालुक्यात संत्र्याला फटका बसला. पावसामुळे फळांच्या प्रतवारीवरही परीणाम झाला. बागांमध्येही चिखल झाला, त्यामुळे संत्रा काढणीलाही अडचण येत आहे.
तिथे हिंगोली (Hibgoli) जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसांनंतर काढणीला आलेला सोयाबीन पाण्यात भिजल्याने नुकसान झालं आहे. आधीच अतिवृष्टी आणि महिन्याभराच्या उघडीपीमधून कसे बसे वाचलेले सोयाबीन या पावसामुळे भिजून खराब झाली आहेत.
कोकणातही (Konkan Rain Updates) परिस्थिती चिंताजनक...
सिंधुदूर्ग (Sindhudurg) जिल्ह्यात मागच्या काही तासांपासून कणकवली आणि कुडाळ परिसरात पाऊस कोसळतोय. त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. मागचे पाच ते सहा महिने मेहनत घेऊन पिकवलेली भात शेती आता कापणीसाठी परिपक्व झालीये. पण या अवकाळी पावसामुळे बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्या जाण्याची शक्यता आहे.