IAS Pooja Khedkar Mother Viral Video: पुण्यातील आयएएस अधिकारी पूजा खेडकर हे नाव रोज चर्चेत असून, देशभरात हे प्रकरण गाजत आहे. आपल्या खासगी ऑडी गाडीवर लाल दिवा लावण्यामुळे अडचणीत आलेल्या पूजा खेडकर यांनी सेवेत दाखल होण्यापूर्वीच अनेक मागण्या केल्या होत्या. प्रशिक्षणार्थी असतानाच पूजा खेडकर यांनी कार, स्वीय्य सहाय्यकाबरोबरच वेगळ्या केबिनसाठी मागणी केली होती. त्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयातील व्यक्तीबरोबरच व्हॉट्सअप चॅट समोर आले आहेत. तसंच दिव्यांग म्हणून मिळालेलं प्रमाणपत्रही वादात साडलं असून वडिलांची संपत्ती 40 कोटींहून अधिक असताना पूजा यांनी नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र कसं मिळवलं असा प्रश्न विचारला जात आहे. या सर्वांवरुन वाद सुरु असतानाच आता पूजा खेडकर यांच्या आईचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत त्या हातात बंदूक घेऊन शेतकऱ्यांना धमकावताना दिसत आहेत.
व्हिडीओत पूजा खेडकर पिस्तुलाचा धाक दाखवत शेतकऱ्यांना धमकावत असल्याचं दिसत आहे. "जागा माझ्या नावावर आहे. मूळ मालक मी आहे. सातबारा माझ्या नावावर आहे. मला आधी कोर्टाचा कागद आणून दाखवायचा," असं मनोरमा खेडकर हातात पिस्तूल घेऊन वाद घालताना म्हणत आहेत. "मी कोर्टात येणार, काय व्हायचं ते होऊ दे," असं मनोरमा म्हणताना दिसत आहेत.
व्हिडीओ शूट करणारा शेतकऱ्यांबरोबरची व्यक्ती, 'मॅडम आपलं कायदेशीर सुरु आहे. तुम्ही आम्हाला का त्रास देताय?' असं विचारतो. त्यावर मनोरमा, "तुम्ही मला कायद्याचं सांगू नका. कायद्याने मला सांगितलेलं नाही की तुम्ही करु नका म्हणून," असं उत्तर देताना दिसतात. त्यानंतर बराच वेळ हा वाद सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.
पूजा खेडकर यांना प्रसारमाध्यमांनी आईचा व्हिडीओ तसंच इतर आरोपांबद्दल विचारलं असता त्यांनी, माझ्याकडे प्रसारमाध्यमांशी बोलण्याचा अधिकार नाही सांगत जास्त भाष्य कऱणं टाळलं. माझं जे काही म्हणणं असेल ते मी समितीकडे मांडणार आहे. मी या विषयावर बोलू शकत नाही असं पूजा खेडकर यांनी सांगितलं आहे.