कल्याणमध्ये आठवडी बाजारात तुफान गर्दी, फेरीवाल्यांवर पालिकेचं दुर्लक्ष

एकीकडे कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असताना बाजारात लोकांची मोठी गर्दी

Updated: Mar 19, 2021, 08:34 PM IST
कल्याणमध्ये आठवडी बाजारात तुफान गर्दी, फेरीवाल्यांवर पालिकेचं दुर्लक्ष title=

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात गेल्या 3 दिवसांपासून सलग 500 पेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर शनिवारी आणि रविवारी फेरीवाले आणि हातगाडीवरील खाद्यपदार्थ विक्रीला केडीएमसी प्रशासनातर्फे मनाई करण्यात आली आहे. पण कल्याण-डोंबिवली परिसरात अनेक ठिकाणी अजूनही मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. अनेक ठिकाणी आठवडी बाजार भरतात. आज देखील कल्याण पूर्व भागातील विठ्ठलवाडी परिसरात अशाच प्रकारे आठवडी बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली पाहायला मिळाली. ज्याकडे प्रशासनाचं साफ दुर्लक्ष होत आहे. 

विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकापासून ते खडेगोळवली गाव पर्यंत हा बाजार भरतो. 8 नंतर दुकाने बंद करण्याचे आदेश असताना देखील 11 वाजेपर्यंत अनेक ठिकाणी खाद्य पदार्थांची दुकाने उघडी असताना पाहायला मिळत आहेत. कल्याण-डोंबिवली भागात दररोज आता 500 हून अधिक रुग्ण वाढू लागले आहेत. पण याबाबत नागरिकांना ही गांभीर्य नसल्याचं दिसत आहे. त्यातच या फेरीवाल्यांवर पालिका देखील मेहरबान असल्याचं चित्र आहे. तक्रारी करुनही काहीही कारवाई होत नसल्याचं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे.

मुंबई पाठोपाठ कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या कल्याण-डोंबिवली क्षेत्रात पुन्हा एकदा कोरोनाची रुग्ण संख्या वाढताना दिसत आहे. गेल्या एक महिन्यापासून कल्याण डोंबिवली क्षेत्रात दररोज आढळणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या 250 ते 400 च्या घरात होती. मात्र आता ही संख्या 500 च्या वर गेली आहे. कोरोना प्रादुर्भाव पुन्हा वाढत आहे.  गेल्या आठवड्यात पालिकेने काही निर्बंध लावून दिले आहे मात्र नियम पाळताना सुद्धा दिसत नाही. एकीकडे पालिका निर्बंध लावते तर दुसरीकडे नियमांचे उल्लघन करताना दिसत आहेत. 

सोशल डिस्टसिंगचा पुरता फज्जा उडालेला पाहायला मिळत आहे. फेरीवाले सर्रास बसलेले पाहायला मिळत आहे. त्याच्या तोंडावर मास्क सुद्धा दिसत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.