अतिवृष्टीचा इशाऱ्यानंतर पुणे, नवी मुंबईसह या भागात शाळांना सुट्टी जाहीर

14 जुलै रोजी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आतापर्यंत पुणे आणि नवी मुंबईत ही सुट्टी जाहीर झाली आहे.

Updated: Jul 13, 2022, 06:35 PM IST
अतिवृष्टीचा इशाऱ्यानंतर पुणे, नवी मुंबईसह या भागात शाळांना सुट्टी जाहीर title=

मुंबई : राज्यात अनेक भागात पावसाचा जोर कायम आहे. काही भागात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पुणे आणि नवी मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

अतिवृष्टीची परिस्थिती लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा आणि विद्यालयांना उद्या गुरुवारी 14 जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

याशिवाय अतिवृष्टीची परिस्थिती यापुढेही अशीच राहिल्यास शाळेस सुट्टी घेण्याचे अधिकार शाळा व्यवस्थापनाला देण्यात आल्याची माहिती शिक्षण उपायुक्त जयदीप पवार यांनी दिली आहे.

पुण्यात ही इयत्ता बारावी पर्यंतच्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता परिपत्रक काढून सर्व शाळांना सुट्टी देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी उद्या पहिली ते बारावी पर्यंतच्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर केले असून इंदापूर, बारामती, दौंड आणि शिरूर, पुरंदर तालुके वगळता इतर सर्व ठिकाणच्या शाळांना उद्या सुट्टी असणार आहे.

वसई-विरार मधील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर. पालघर जिल्हाधिकारी माणिकराव बुरसाळ यांचे आदेश. अतिमुसळधार पावसामुळे सर्व अंगणवाडी, खाजगी आणि सरकारी शाळा उद्या बंद राहणार.