मराठा आरक्षणासाठी शिंदे गटाच्या खासदाराचा राजीनामा; आणखी कोण आहे राजीनामा देण्याच्या तयारीत?

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हिंगोलीचा खासदार हेमंत पाटील यांनी राजीनामा दिला आहे. 

वनिता कांबळे | Updated: Oct 29, 2023, 04:55 PM IST
मराठा आरक्षणासाठी शिंदे गटाच्या खासदाराचा राजीनामा; आणखी कोण आहे राजीनामा देण्याच्या तयारीत?  title=

Maratha Reservation :  शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) यांनी राजीनामा दिला आहे.  मराठा आरक्षण मुद्द्यावर हेमंत पाटील यांनी राजीनामा दिला आहे.  गावागावत आंदोलन आणि उपोषण होत असताना आता मराठा आंदोलनासाठी राजीनामा सत्र सुरु होण्याची चिन्ह दिसत आहेत. 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हिंगोलीचा खासदार हेमंत पाटील यांनी राजीनामा दिलाय. मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणारे ते पहिलेच खासदार आहेत. लोकसभा अध्यक्षांच्या नावानं त्यांनी राजीनाम्यांचं पत्र दिल आहे. हेमंत पाटील हे हिंगोलीचे शिवसेना शिंदे गटाचे खासदार आहेत.

आरक्षणासाठी मी माझ्या पदाचा राजीनामा देतोय

महाराष्ट्रात मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या विषयावर समाजाच्या भावना तीव्र असून, मी अनेक वर्षांपासून मराठा समाजासाठी, शेतक-यांसाठी भांडणारा कार्यकर्ता आहे. आरक्षणाच्या आंदोलनाला माझा पाठिंबा असून, आरक्षणासाठी मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे, असं त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात लिहिलंय.

जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी मराठा आरक्षणासाठी राजीनामा देण्याची तयारी 

मराठा आरक्षणासाठी राज्यात ठिकठिकाणी राजकीय नेत्यांना गावबंदी केली असताना जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी मराठा आरक्षणासाठी राजीनामा देण्याची तयारी दर्शवलीय. आपण लवकरच यासंदर्भात मराठा संघटनांची चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं अतुल बेनकेंनी सांगितलंय. आ. अतुल बेनके यांनी मराठा आंदोलनात सहभागी होत मराठा आरक्षणाच्या लढ्यात उतरण्याचा निर्धार केलाय. 

प्रकृती खालावली असतानाही मनोज जरांगे उपोषण आंदोलनावर ठाम

प्रकृती खालावली असतानाही मनोज जरांगे उपोषण आंदोलनावर ठाम आहेत. पाणी पिण्यास तसंच वैद्यकीय उपचार घेण्यास जरांगेंनी नकार दिला आहे. आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, असं त्यांनी दुपारी स्पष्ट केले. सरकारनं आरक्षण द्यावं, नाहीतर मराठ्यांचा सामना करावा असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

आरक्षणासाठी टोकाचं पाऊल उचलू नका

संभाजीराजे छत्रपतींनी मनोज जरांगेंसह मराठा समाजाला आवाहन केले. आरक्षणासाठी टोकाचं पाऊल उचलू नका. आत्महत्या करू नका. आरक्षणाची लढाई आपण लढत आहोत, आणि पुढे आरक्षण मिळवून देखील दाखवू. जरांगेंनी पाणी पिऊन आमरण उपोषण करावं असं आवाहन संभाजीराजेंनी केलंय.

धाराशीवमध्ये मराठा आरक्षणासाठी तरूणांनी स्वत:ला गाडून घेतलंय

धाराशीवमध्ये मराठा आरक्षणासाठी तरूणांनी स्वत:ला गाडून घेतलंय. धाराशिव जिल्ह्यातील मेडसींगा गावात तरुण आक्रमक झाले असून उच्चशिक्षित मराठा तरुणांनी स्वतःला जमिनीत गाडून घेत आंदोलन केलं. यावेळी आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा तरूणांनी जोरदार घोषणाबाजीही केली.