मुंबई : Chiplun flood : चिपळूण, खेड, संगमेश्वरमध्ये पावसाचा हाहाकार दिसून आला आहे. (Heavy rains in Chiplun) हजारो लोक पुराच्या पाण्यात अडकले आहेत. येथील विद्युत पुरवठा खंडीत करण्यात झाला आहे. त्यामुळे दुसरा दिवसही अंधारात काढवा लागला आहे. पुराचे पाणी अजूनही पाणी कमी झालेले नाही. दरम्यान, NDRF चे बचावकार्य सुरू झाले आहे. (NDRF rescue operation started in Chiplun) संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आले आहे. विदर्भातल्या अमरावतीत पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. (Maharashtra flood)
तर दुसरीकडे रायगड जिल्ह्यातील महाडच्या तळीये गावात कोसळलेल्या दरडीत 32 घरं बाधित झाली आहेत. 72 जण अडकल्याची माहिती आहे. नागरिकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी 'झी 24 तास'ला माहिती दिली आहे.
कोकणात पावसाचा हाहाकार सुरू आहे. संपूर्ण पाण्यात गेलेल्या चिपळूणमध्ये एनडीआरएफचं एक पथक पोहचले आहे. त्यामुळे आता चिपळूणकरांमना दिलासा मिळाला आहे. तब्बल पाच हजार लोकं पाण्यात अडकली आहेत. या लोकांना सुखरूप स्थळी हलवण्याचं काम सुरू आहे. चिपळूणमध्ये 2005 नंतर भीषणपरिस्थिती उद्भवली आहे. वाशिष्ठी, शिव नदीला पूर आला आहे. खेडमध्येही जगबुडी नदीला महापूर आला आहे. तर, अनेक गाड्या पाण्यात बुडाल्या आहेत. अतिशय भयावह स्थिती त्याठिकाणी उद्भवली आहे. चिपळूणमध्ये मदतकार्याला सुरुवात झाली आहे. घरांमध्ये अडकलल्या नागरिकांना बोटीने बाहेर काढण्यात येते आहे.
राज्यातील पूर परिस्थितीसंदर्भात गुरुवारी सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्र्यांना राज्य शासनामार्फत बचाव कार्य कसे सुरू आहे त्याचप्रमाणे कुठल्या उपाययोजना केल्या जात आहेत त्याची माहिती दिली. बचाव आणि मदत कार्यात केंद्र सरकार राज्याला सर्वतोपरी मदत करेल असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.
पूरग्रस्त रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात आता बचावकार्यासाठी नौदल, सैन्य दलाच्या तुकड्याही उतरल्या असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने जिल्ह्यांतील अद्ययावत माहिती घेत आहेत. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानंतर कोकण विभागात रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे, या जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थती निर्माण झाली. रायगड, ठाणे, रत्नागिरी व कोल्हापूर जिल्ह्यांमधील अनेक नद्या धोका पातळीवर वाहत असल्याने एनडीआरएफ, तटरक्षक दल, नौदल तसेच सैन्यदलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. पूर परिस्थितीत मदत व बचावकार्य करण्यासाठी शासनाकडून तात्काळ उपाययोजना सुरू आहेत अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.
तसेच पुणे विभागातील संभाव्य पूरपरिस्थिती लक्षात घेवून सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये सुध्दा एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात येत आहे.रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टर मार्फत मदत आणि बचावकार्य करण्यात येत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असून जिल्ह्यातील बहुतांशी नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. पूरपरिस्थितीमध्ये मदतकार्यासाठी एनडीआरएफच्या दोन तुकड्या जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. एक तुकडी शिरोळ तालुक्यात तर दुसरी तुकडी करवीर तालुक्यात पोहोचली आहे. आयआरबी बोट, गोताखोर सेट, लाईफ जॅकेट, रेस्क्यू रोप आदी अत्याधुनिक साधनांसह प्रत्येकी 25 जवानांची दोन पथके सज्ज झाली आहेत.
सातारा : गेल्या दोन तीन दिवसांपासून जिल्ह्यात चांगला पाऊस पडत आहे. काल कोयना धरणात 72 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. पडत असलेल्या पावसामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक मोठी आहे. उद्या 23 जुलै रोजी सकाळी 10 वाजता कोयना धरणातून 10 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येणार आहे. तरी कोयना नदी काठच्या नागरिकांनी न घाबरता सतर्क रहावे, असे आवाहनही पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.